कळंब-वाशी तालुक्यात दुष्काळी पाहणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

सोयाबीनचे १०० टक्के नुकसान; पीकविमा, शेतमजुरांना मदत, चार छावण्या आणि विद्यार्थ्यांची शुल्कमाफी करण्याची मागणी

यशश्री अपडेट्स | धाराशिव :

धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाअभावी मोठे संकट ओढवले असून, कळंब आणि वाशी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी सोयाबीनचे पीक जवळपास १०० टक्के वाया गेले असून, खरीपातील इतर पिकांची अवस्थाही अत्यंत गंभीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात पावसाने मोठी दडी मारल्याने पिकांना आवश्यक वेळी पाणी मिळाले नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटली, अनेक ठिकाणी पिके करपली असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीनसह मूग, उडीद, तूर, मका आणि इतर खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

खरीप तर गेला, रब्बीचीही आशा मावळली

पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम तर हातातून गेला आहेच; मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे आगामी रब्बी हंगामाबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने रब्बीची पेरणी करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना जाहीर करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी

दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ही मदत थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

याशिवाय मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पीकविम्याची हेक्टरी १७ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, तसेच यंदाच्या पीकविम्याची पूर्ण भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शेतमजूर कुटुंबांसाठी २५ हजारांची मदत

दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसला नसून ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. शेतीची कामे कमी झाल्याने शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतमजूर कुटुंबाला २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

चार छावण्या सुरू करण्याची मागणी

पाणीटंचाई आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता संबंधित भागात चार छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

दुष्काळावर विशेष अधिवेशनाची मागणी

धाराशिवसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी शासनाने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र देण्यात आले असून, शासन या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान डॉ. प्रतापसिंह पाटील, सक्षणाताई सलगर, पंकज नाना बोराडे, सोनू सोनटक्के, विश्वंभर मैंदाड, तुषार वाघमारे, रोहित बागल, पंकज भोसले, ॲड. मिराजी मैंदाड, तुकाराम जगताप, अक्रूर मामा सोनटक्के, किरण शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

कळंब आणि वाशी तालुक्यांतील प्रत्यक्ष पाहणीतून समोर आलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!