‘आरक्षण असते तर माझा मुलगा अधिकारी झाला असता’; प्रथमेशच्या आईचा आक्रोश

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच आंदोलन करणार; अभिजीत दिपके यांची भूमिका

यशश्री अपडेट्स|परंडा |

परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने पुणे येथे आपल्या राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने खासापुरीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज खासापुरी येथे देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी प्रथमेशच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना त्यांच्या आईने आपल्या मुलाच्या भविष्याबाबतच्या अपेक्षा आणि त्याच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले. भावनिक झालेल्या आईने, “आरक्षण असते तर माझा मुलगा नोकरीला लागला असता, अधिकारी झाला असता,” अशी भावना व्यक्त केली.

या घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. केवळ आरक्षणाचा प्रश्न नव्हे, तर परीक्षा वेळेवर होणे, निकाल वेळेवर जाहीर होणे, पेपरफुटीसारख्या घटनांना आळा बसणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणे या मूलभूत बाबींकडेही शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेत असतात. मात्र परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि निवड प्रक्रिया कधी पूर्ण होणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली तर विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक ताण वाढतो. पेपरफुटीसारख्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण होतात.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच आंदोलन

यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लवकरच आंदोलन उभारणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत, निकाल वेळेत लागले पाहिजेत. पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा बसला पाहिजे. विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि सक्षम परीक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे. या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लवकरच आंदोलन करणार असून, त्यांच्या न्यायाच्या लढ्यात मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे,” अशी भूमिका अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.

आरक्षणाचा प्रश्न असो किंवा मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न असो, या प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ आश्वासनांपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि पारदर्शक स्पर्धा परीक्षा व्यवस्था मिळणे आवश्यक असल्याचेही अभिजीत दिपके यांनी नमूद केले.

प्रथमेशच्या निधनामुळे एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे. या घटनेच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्यावर असलेला ताण आणि भविष्यातील अनिश्चितता यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!