अक्कलकोट-वेळापूरमध्ये आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या; प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प, ‘एक मराठा, कोटी मराठा’च्या घोषणांनी परिसर दणाणला
यशश्री अपडेट्स | अकलूज/अक्कलकोट
मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर आणि अक्कलकोट येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी भगवे ध्वज आणि भगवी उपरणी परिधान करून जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.
वेळापूरमध्ये एक तास रास्ता रोको

माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सहा दिवसांचा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत वेळापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वेळापूर येथील पालखी चौकात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावरील ओव्हरब्रिज आणि त्याखालील चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे पंढरपूर, इंदापूर, अकलूज आणि सांगोल्याकडून येणारी व जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
खांद्यावर भगवी उपरणी आणि हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलकांनी पुलाखालील चौकात चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर तसेच ओव्हरब्रिजवर बैठक मारून रास्ता रोको केला.
घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनादरम्यान ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘एक मराठा, कोटी मराठा’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही’ तसेच ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
आंदोलकांनी पूर्वनियोजित वेळेनुसार आंदोलन शांततेत संपविले. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सिद्धार्थ जावीर, मंडळ अधिकारी संदीप चव्हाण, तलाठी सावता गोरे तसेच वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्यासह प्रशासन आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी घेतली पुढाकार
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, आंदोलनाची वेळ संपल्यानंतर अनेक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत वाहनांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम केले. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.
अक्कलकोटमध्येही रास्ता रोको; तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
दरम्यान, अक्कलकोटमध्येही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे संयोजक तथा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अक्कलकोट-सोलापूर राजमार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर, कर्नाटक आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलकांनी उड्डाणपुलासह पाच प्रमुख मार्ग एकाच वेळी रोखून धरले. आंदोलनात युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महिलांनीही लक्षणीय संख्येने सहभाग नोंदविला.
‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी वातावरण भारावले
आंदोलनादरम्यान ‘एक मराठा, लाख मराठा’सह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी नगरसेवक संजय मोरे (मैंदर्गी), शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, शिवप्रतिष्ठानचे वरुण शेळके, गोपीचंद लोंढे आणि वंदना टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे संयोजक अमोलराजे भोसले, सुरेश सूर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण घाटगे, तम्मा शेळके, मनोज निकम, अण्णासाहेब सुरवसे, सुधाकर गोंडाळ, प्रथमेश पवार, बालाजी पाटील यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने तीव्र होत असून, वेळापूर आणि अक्कलकोट येथील रास्ता रोको आंदोलनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
