प्रतिकूलतेवर मात करत ‘ज्ञानेश्वरी’चे यश; ९१.४०% गुणांनी गाठले शिखर

  
यशश्री अपडेट्स -परंडा: (प्रतिनिधी) 

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे देवगाव खुर्द (ता. परंडा) येथील ज्ञानेश्वरी सुग्रीव चौधरी या विद्यार्थिनीने सिद्ध केले आहे. २०२५ मधील अतिवृष्टीचा मोठा फटका बसूनही, ज्ञानेश्वरीने दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे.घरची परिस्थिती आणि संघर्ष:ज्ञानेश्वरीचे वडील सुग्रीव चौधरी हे अल्पभूधारक शेतकरी असून अत्यंत गरिबीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ज्ञानेश्वरी बावची येथील विद्यालयात शिक्षणासाठी जात असे. घरातून शाळेत जाण्या-येण्यासाठी बसची सोय नसल्याने आणि परिस्थितीअभावी दुचाकी घेणे शक्य नसल्याने, ती दररोज पायपीट करत शाळेत जात होती.अतिवृष्टीचे संकट:२०२५ मध्ये परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा चौधरी परिवाराला बसला. त्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, जनावरे आणि ज्ञानेश्वरीचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले होते. राहत्या घराचे नुकसान झाल्यामुळे आभाळ फाटले होते, मात्र अशा कठीण प्रसंगातही ज्ञानेश्वरीने आपला अभ्यासाचा ध्यास सोडला नाही. शाळेचे साहित्य वाहून गेलेले असतानाही उपलब्ध साधनांच्या जोरावर तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.कौतुकाचा वर्षाव:ज्ञानेश्वरीच्या या यशानंतर परंडा तालुक्यातून तिचे मोठे कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकरी आणि विविध संघटनांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष जमीर शिकलकर, जगन्नाथ चौधरी, सुग्रीव चौधरी, दीपक चौधरी, समाधान पवार, अतुल चौधरी, भरत चौधरी, साक्षी महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *