४० हजारांची लाच घेताना दोन पोलिस अंमलदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

कळंब – यशश्री अपडेट्स : कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागुन 36 हजार रुपये लाच घेताना 2 पोलिस अंमलदार यांना रंगेहात पकडण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जालना येथील पोलिस उप अधीक्षक बाळू संपती जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार अशोक दादाराव करवर व सिद्धेश्वर प्रकाश शिंदे या 2 आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

तक्रारदार यांचा कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय असून तो सुरळीत चालू ठेवण्यासाठी पोलिस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे हे पोलिस निरीक्षक यांचेसाठी 20 हजार रुपये व पोलिस अंमलदार अशोक करवर हे दुय्यम अधिकारी यांचेसाठी 20 हजार असा 40 हजार रुपयांचा हप्ता लाच म्हणुन मागितला.

यावरून तक्रारदार यांनी अधिकारी यांना भेटण्याची दोन्ही लोकसेवकांकडे इच्छा व्यक्त केली असता लोकसेवकांनी तक्रारदार यांना सांगितले की तू जर अधिकारी यांना भेटलास तर ते तुझा स्पाचा धंदा बंद करून तुझ्यावर कारवाई करण्यास लावतील, तुझा धंदा सुरळीत चालवायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल व त्या विषयी जर काही बोलायचे असेल तर ते आमच्या दोघांशी बोलावे लागेल असे सांगितले.

तक्रारदार हे पंच यांचे सोबत बागवान चौक कळंब येथे गेले असता तेथे लोकसेवक सिद्धेश्वर शिंदे यांनी पोलिस निरीक्षक यांचेसाठी 20 हजार व लोकसेवक अशोक करवर यांनी दुय्यम अधिकारी यांचेसाठी 16 हजार रुपये असे एकूण दोघांनी मिळून 36 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे पंचासमक्ष कबुल केले, त्यानंतर सापळा लावुन कळंब शहरातील होळकर चौकातुन तांदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल गुलमोहर बिर्याणी हाऊस समोर तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक व शशिकांत सिंगारे , अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विजय वगरे पोलिस निरीक्षक ला.प्र.वि.धाराशिव हे तपास करीत आहेत. सापळा पथकात पोहेकॉ गजानन घायवट, पोअंमलदार मनोहर भुतेकर ,गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे,चालक पी हवा भालचंद्र बिनोरकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *