यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरनंतर कळंब येथे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत, तर दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेत पोलिसांना कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सरनाईक म्हणाले की, ड्रग्ज हा केवळ गुन्हेगारीचा विषय नसून तो समाजाच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देऊ नये. “ड्रग्ज हे विष आहे; राजकारणापेक्षा समाजहित महत्त्वाचे आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना नैतिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
लोकप्रतिनिधींचीही नैतिक जबाबदारी
कळंब येथील प्रकरणाचा संदर्भ देताना सरनाईक म्हणाले की, काही लोकप्रतिनिधींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. मात्र एवढ्यावर जबाबदारी संपत नाही.
“तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी ड्रग्जचे सेवन किंवा विक्री करत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी पक्ष नेतृत्वावरही येते. मी कोणत्या एका पक्षावर टीका करत नाही. कोणत्याही पक्षाचा माणूस असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे ते म्हणाले.
तुळजापूर प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत
तुळजापूर येथील यापूर्वीच्या ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्या तपासात मुंबईपर्यंत धागेदोरे सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ड्रग्ज नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक तपासाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जिल्ह्यातील कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती, ड्रग्ज तस्करी किंवा विक्री करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करून तुरुंगात टाका,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना दिल्याचे सांगितले.
कोणाचाही वरदहस्त चालणार नाही
पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही पक्षाचा, नेत्याचा किंवा प्रभावशाली व्यक्तीचा वरदहस्त असला तरी पोलिसांनी अजिबात हयगय करू नये.
“भाजप, शिवसेना, उबाठा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता अथवा लोकप्रतिनिधी ड्रग्ज प्रकरणात सहभागी असेल, तर त्याला मदत करणाऱ्या नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे. समाजाला विष देणाऱ्यांना वाचवणाऱ्यांनाही कायद्याचा सामना करावा लागेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तरुण पिढी वाचवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक
ड्रग्जमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करताना सरनाईक म्हणाले की, ड्रग्ज विक्री हा समाजघातकी गुन्हा आहे.
“तरुणांचे भविष्य वाचवायचे असेल, तर ड्रग्ज विक्रेते आणि तस्करांना तुरुंगाची हवा खावीच लागेल. राजकीय फायदा-तोटा पाहण्यापेक्षा समाजाचा विचार करा. लहान मुले आणि तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका,” असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले.
मकोका कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न
राज्य सरकार ड्रग्जविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रग्जच्या बाबतीत अत्यंत कठोर आहेत. नार्कोटिक्सशी संबंधित काही कायदे कमकुवत असतील, तर त्यामध्ये सुधारणा केली जाईल. मकोका कायद्यात बदल करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. आवश्यक असल्यास ड्रग्ज गुन्हेगारांवर मकोकापेक्षाही अधिक गंभीर कारवाई करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात उघडकीस आलेल्या सलग ड्रग्ज प्रकरणांमुळे पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून या नेटवर्कमागील आर्थिक, राजकीय आणि गुन्हेगारी संबंधांचा तपास सुरू आहे. पालकमंत्री सरनाईक यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे ड्रग्जविरोधी मोहिमेला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
