यशश्री अपडेट्स | परंडा
परंडा येथील कल्याणसागर समूहाच्या सरस्वती प्राथमिक शाळा आणि कल्याणसागर माध्यमिक विद्यालयात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रनिर्माण, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील, संस्थेच्या सचिव प्रज्ञाताई कुलकर्णी, रामचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ निवृत्त क्रीडा शिक्षक शिवाजीराव कदम, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ साळुंके, दत्तात्रय धनवे, समीर गंधे, महादेव नरुटे, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक, सामाजिक आणि स्पर्धा परीक्षांमधील उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जगन्नाथ साळुंके यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञान विषयाबद्दलची आवड वाढावी या उद्देशाने रामचंद्र कुलकर्णी यांनी 5,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करून विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या घोषणेचे उपस्थितांनी स्वागत केले.
यावेळी माजी विद्यार्थी समीर गंधे यांनी एस.आर.जी. एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून इयत्ता चौथी ते सातवीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तालुक्यात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारा अंश लांडगे, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील श्रावी व्यवहारे, आठवी एनएमएमएस परीक्षेतील स्वरा व्यवहारे, मंथन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणारा ओम गोफणे, तसेच ‘मी ज्ञानी होणार-2026’ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले सुरभी दीक्षित, अशोक आगरकर आणि समर्थ सायकर यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

आपल्या मनोगतात सुजितसिंह ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विज्ञान, संशोधन, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेम यांचा स्वीकार करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. शिक्षण संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंदे आणि अजित गव्हाणे यांनी केले, तर गणेश पवार यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
