यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याच्या तयारीत असून जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे संकेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले आहेत. जुने आणि नवे पदाधिकारी यांची एकत्रित मोट बांधून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच धाराशिव जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला बनविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जातील, असा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्हा शिवसेनेची तत्कालीन कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नवीन कार्यकारिणीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. आता त्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे चित्र असून संघटनात्मक फेरबांधणी अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, “जुने-नवे असा वाद निर्माण न करता सर्वांना सोबत घेऊन एक सक्षम संघटन उभे करायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून, तालुका व जिल्हास्तरावर सक्रिय नेतृत्वाला संधी देत लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मते, विविध गटांचे प्रतिनिधित्व आणि आगामी निवडणुकांची तयारी या सर्व बाबी लक्षात घेऊन कार्यकारिणीची रचना केली जाणार आहे.
संघटनात्मक समतोलाचे मोठे आव्हान
नवीन कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे विविध राजकीय गटांमध्ये समतोल राखणे हे असणार आहे. विशेषतः राणाजगजीतसिंह पाटील समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही नेत्यांची संघटनात्मक पदांवर होणारी संभाव्य घुसखोरी रोखणे, तसेच मूळ शिवसैनिकांना न्याय देणे, ही नेतृत्वासाठी महत्त्वाची कसोटी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपात गेलेले काही पदाधिकारी पुनरागमनाच्या तयारीत?
गेल्या काही महिन्यांत सत्तेतील विकासकामांच्या मुद्यावर शिवसेनेतील काही पदाधिकारी भाजपात दाखल झाले होते. मात्र तेथील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असलेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आगामी कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्यावर भर
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना संघटन मजबूत करण्याच्या तयारीत आहे. बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिला जाणार असून, प्रत्येक तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पालकमंत्री सरनाईक यांच्या विधानामुळे धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. नवीन कार्यकारिणीत कोणाला संधी मिळणार, कोणते जुने पदाधिकारी पुन्हा सक्रिय होणार आणि पक्षातील विविध गटांमध्ये कसा समतोल साधला जाणार याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
