परंडा येथे कल्याणसागर समूहातर्फे सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
यशश्री अपडेट्स|परंडा:
कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक श्री. महादेव नरुटे आणि सिद्धेश्वर विद्यालय देवगावचे मुख्याध्यापक श्री. निर्मलकुमार गांधले यांच्या नियत वयोमानानुसार झालेल्या सेवापूर्तीचा सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सोहळा कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडला.
पालक व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना सुजितसिंह ठाकूर यांनी श्री. नरुटे सर व श्री. गांधले सर यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना भावी निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ठाकूर साहेब म्हणाले, “संस्थापक अध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी सदैव चोखपणे पार पाडली आहे. भविष्यात माझ्या आजी-माजी विद्यार्थ्यांना अथवा त्यांच्या पालकांना कोणतीही शैक्षणिक, सामाजिक किंवा आर्थिक अडचण आल्यास ती तात्काळ दूर केली जाईल.” तसेच, आज संस्थेतून घडलेले अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत असून ते नियमित संपर्कात असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.
NEET परीक्षेत ६५६ गुण मिळवणाऱ्या उत्कर्षचा विशेष सहभाग
NEET परीक्षेत ६५६ गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केलेल्या उत्कर्ष कोठावळे याने या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आपल्यातील उणिवा ओळखून त्यावर मात कशी करावी आणि स्वतःच्या ध्येयापर्यंत कसे पोहोचावे,” याबद्दल त्याने स्वतःचे उदाहरण देत अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले.
गुरुजनांप्रति कृतज्ञता
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली. सेवापूर्तीनिमित्त सत्कारमूर्ती नरुटे सर व गांधले सर यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासातील विविध अनुभव सांगून उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.
या सोहळ्यास मुख्याध्यापक काशीद सर, पडघन सर, पवार सर, ठाकूर सर, गरड सर, गोरे सर, रहमत शेख सर, चामवड सर, शेरे सर यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी, सत्कारमूर्तींचे नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी उत्तमरीत्या सांभाळले. शेवटी उपस्थितांचे आभार गणेश पवार यांनी मानले.
