अनिल काळे अपमान प्रकरणाचे जिल्ह्यात तीव्र पडसाद; गटबाजी, जुन्या निष्ठावंतांची गळचेपी आणि व्यक्तीकेंद्री राजकारणावर जोरदार हल्लाबोल
यशश्री अपडेट्स | धाराशिव भाजप नेते अनिल काळे यांच्या कथित अपमान प्रकरणाचे पडसाद आता धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अत्यंत तीव्रतेने उमटू लागले आहेत. या घटनेमुळे पक्षांतर्गत धुमसणारी नाराजी अखेर उफाळून आली असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी पक्षातील वाढती गटबाजी, जुन्या कार्यकर्त्यांचा अवमान आणि एकाधिकारशाहीवर सडकून टीका केली आहे. “आम्ही २५ ते ३० वर्षे संघर्ष करून धाराशिवमध्ये पक्ष उभा केला; परंतु सत्ता आल्यावर काही लोक स्वतःला पक्षाचे मालक समजून वागत आहेत,” असा थेट आणि गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
‘स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या, मग कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का?’
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष घणाघात करताना संताजी चालुक्य म्हणाले की, पक्षात एकाच घरात दोन-दोन संविधानिक पदे बळकावली जात आहेत. स्वतःच्या कुटुंबासाठी लाल गालिचे आणि पायघड्या घातल्या जात असताना, ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्यांनी आयुष्यभर केवळ सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या मनातील ही वेदना आणि खदखद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत समजून घेण्याची अत्यंत गरज आहे.
संताजी चालुक्य यांच्या घणाघाती टीकेतील प्रमुख ६ मुद्दे:
- १. निष्ठावंतांचा अवमान आणि नवीन नेत्यांची मनमानी: पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे. ज्यांनी शून्यातून पक्ष उभा करण्यासाठी हयात घालवली, त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक देणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अनिल काळे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा आणि अत्यंत निषेधार्ह आहे.
- २. भाजपात ‘राष्ट्रवादी संस्कृती’ रुजवण्याचा प्रयत्न: ज्या नेत्यांच्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी एकेकाळी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, त्यांना पक्षात आल्यावर आम्ही मोठ्या मनाने स्वीकारले. मात्र, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची तीच आयात केलेली संस्कृती आता भाजपात रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
- ३. फोटो आणि बॅनर राजकारणातून ‘मनाचा कोतेपणा’: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुळजापूर दौऱ्यादरम्यान लावण्यात आलेल्या स्वागत कमानी व बॅनरवर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुद्द पक्षचिन्हाचे फोटो गायब करण्यात आले होते. “फोटो नसत्याने आमच्या कर्तृत्वात फरक पडत नाही, पण यातून संबंधित नेत्यांचा संकुचित दृष्टिकोन व मनाचा कोतेपणा दिसून येतो,” असा सडेतोड टोला त्यांनी लगावला.
- ४. स्वतःचे समर्थक पोसणे आणि पक्षाचा ताबा घेण्याची मानसिकता: भाजप ही कार्यकर्त्यांच्या बळावर आणि बूथ पातळीवरील मेहनतीवर वाढलेली संघटना आहे. परंतु, सध्या पक्षाचा विस्तार करण्याऐवजी स्वतःचे वैयक्तिक समर्थक वाढवणे आणि त्यांना पोसण्यावरच भर दिला जात आहे. पक्ष वाढवण्यापेक्षा तो स्वतःच्या दावणीला कसा बांधता येईल किंवा काबीज कसा करता येईल, याच मानसिकतेतून काम सुरू आहे.
- ५. अंतर्गत राजकीय प्रतिस्पर्धी संपवण्याचा कुभांड रचल्याचा आरोप: पक्षात भविष्यात आपल्याविरोधात कोणताही राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये, यासाठी पक्षातीलच निष्ठावंतांचा ठरवून पराभव घडवून आणला गेला. जिल्हा परिषद निवडणुकीत काही सक्षम उमेदवारांना पक्षाची उमेदवारी देऊन त्यांचाच राजकीय बंदोबस्त करण्यात आला, असा अत्यंत गंभीर दावा चालुक्य यांनी केला.
- ६. ‘बूथ जितेगा तो देश जितेगा’ घोषणेला हरताळ: पक्षाची मूळ संकल्पना बूथ जिंकण्याची आहे, मात्र सध्या धाराशिवमध्ये थेट बूथ पातळीवरील मूळ कार्यकर्त्यांनाच नाराज आणि डावलण्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन पदांच्या नियुक्त्यांमध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या खास वैयक्तिक समर्थकांना प्राधान्य दिले जात आहे.
पक्षासाठी आजवर शांत राहिलो, पण आता अतिरेक झालाय!
संताजी चालुक्य यांनी शेवटी इशारा देताना सांगितले की, आम्ही अनिल काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. केवळ काळेच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या एकाधिकारशाहीचा रोज अनुभव घेत आहेत. आगामी काळात पक्ष वाढावा आणि त्याची हानी होऊ नये म्हणून सर्वजण आजवर संयम बाळगून शांत राहिले; परंतु आता अन्यायाचा अतिरेक झाला आहे.
पक्षश्रेष्ठींनी धाराशिवमधील या बिकट परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही आणि संबंधितांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा चालुक्य यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे समोर आला आहे.
