शाळेला कुलूप; रिक्त पदांसाठी उद्यापासून जिल्हा परिषद कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन

यशश्री अपडेट्स |परंडा

परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी पदे तब्बल चार वर्षांपासून रिक्त असल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकून ती बंद ठेवली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

गेल्या चार वर्षांपासून शाळेतील अनेक शिक्षक पदांसह शिक्षकेतर कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असून विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, विषयानुसार शिक्षण, मार्गदर्शन तसेच शैक्षणिक उपक्रमांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत घसरण होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून शिक्षण व्यवस्थेतील निष्काळजीपणाविरोधात तीव्र निषेध नोंदविला. शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

उद्यापासून जिल्हा परिषद कार्यालयात बेमुदत आंदोलन

शाळेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर शेकडो पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

जोपर्यंत शिक्षकांसह इतर सर्व रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

२८ जुलैला दिले होते निवेदन

या प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांनी २८ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणताही ठोस निर्णय किंवा नियुक्ती प्रक्रिया सुरू न झाल्याने अखेर आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

शिक्षकांची कमतरता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताhastag द्या प व्यक्त होत असून, या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय घेते का, याकडे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!