यशश्री अपडेट्स | धाराशिव | प्रतिनिधी
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज, रविवार (20 जुलै) रोजी सायंकाळी 4 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी आनंदनगर पोलीस ठाण्याला लेखी पत्र देऊन कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
ही निवेदन मोहीम रविराज उर्फ अण्णासाहेब साबळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनापर्यंत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पोहोचविण्यात येणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजकांनी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या पत्रात आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पडेल, अशी लेखी हमी दिली आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय आंदोलन सुरळीत पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही आयोजकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या आंदोलनाकडे जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिकांची लक्षणीय उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनानंतर शासनाच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
