विहिरींचे काम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना विनाअट पैसे द्या; आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला मंत्री भरत गोगावले यांच्याकडून हिरवा कंदील

यशश्री अपडेट्स (धाराशिव प्रतिनिधी):
वैयक्तिक सिंचन विहिरींचे काम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना तांत्रिक अटी शिथिल करून विनाअट पैसे देण्यात यावेत, ही आमदार कैलास पाटील यांची महत्त्वपूर्ण मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. यासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मक निर्णय घेत, विहिरींचे पैसे विनाअट देण्याचे आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

चूक यंत्रणेची, मग भुर्दंड लाभार्थ्यांना का? – आमदार कैलास पाटील

‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, प्रशासकीय आणि तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. यावर सभागृहात आवाज उठवताना आमदार कैलास पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले.

“अनेक लाभार्थ्यांनी विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘form नंबर ४’ भरला होता. परंतु, त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटींमुळे किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे तो अपलोड होऊ शकला नाही. यामध्ये कर्मचारी आणि यंत्रणेची चूक असताना, आता पुन्हा लाभार्थ्यांना फोटो अपलोड करण्यास सांगितले जात आहे. काम पूर्ण झालेल्या विहिरींचे फोटो आता पुन्हा मजुरांना उभे करून कसे काढायचे? त्यांनी मजूर कुठून आणायचे?” असा संतप्त सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

त्यामुळे फोटो अपलोड करण्याची ही जाचक अट तातडीने रद्द करून, विहिरी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्वरित अदा करावेत, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे दुर्लक्ष; निधी देण्याची मागणी

आमदार कैलास पाटील यांनी यावेळी सरकारला वैयक्तिक लाभाच्या योजनांबद्दल धारेवर धरले. सद्या या योजनेतून रस्ते विकास आणि इतर सार्वजनिक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या हक्काच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

  • सिंचन विहिरी
  • फळबाग लागवड
  • घरकुल योजना
    यांसारख्या थेट सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.

मंत्री भरत गोगावले यांच्याकडून मागणी मान्य; अडचणी दूर करण्याचे आश्वासन

आमदार कैलास पाटील यांनी मांडलेली वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, मंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विहिरींच्या कामात तांत्रिक अडचणींमुळे अडकलेला निधी विनाअट मुक्त केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, केवळ सार्वजनिक कामेच नव्हे, तर विहिरी, फळबागा आणि घरकुल यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांनाही प्राधान्याने निधी देऊन सर्वसामान्य शेतकरी आणि गरजवंतांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, अशी ग्वाही मंत्री गोगावले यांनी यावेळी दिली.
आमदार कैलास पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे धाराशिवसह राज्यातील हजारो विहीर लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *