१७ वर्षांचा संघर्ष संपला; राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करणार, पाटील कुटुंबियांचा इशारा
यशश्री अपडेट्स | धाराशिव: काँग्रेसचे तत्कालीन नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातून माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व ९ आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर धाराशिव जिल्ह्यात डॉ. पाटील यांच्या समर्थकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. पाटील यांच्यावरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी समर्थकांकडून आता ‘सत्यमेव जयते… साहेब’ ही विशेष मोहीम राबवली जात असून, घरोघरी डॉ. पाटील यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावले जात आहेत.
१७ वर्षांनंतर सत्याचा विजय: मल्हार पाटील
डॉ. पद्मसिंह पाटील यांना केवळ राजकीय स्वार्थापोटी या हत्याकांडात गोवण्यात आले होते, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर संघर्षानंतर डॉ. पाटील यांना अखेर न्याय मिळाला असून सत्याचा विजय झाला आहे, अशी भावना त्यांचे नातू मल्हार पाटील यांनी व्यक्त केली.
“हा निकाल केवळ डॉ. पद्मसिंह पाटील यांचा विजय नाही, तर हा सत्याचा, न्यायाचा आणि गेल्या अनेक दशकांपासून पाटील कुटुंबावर जिवापाड प्रेम करणाऱ्या तमाम जनतेच्या विश्वासाचा विजय आहे,” असे मल्हार पाटील म्हणाले.
तसेच, १९९० च्या दशकात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. पुढे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देशाच्या राजकारणात त्यांना मोठी जबाबदारी आणि केंद्रीय कॅबिनेट विस्तारात संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, त्यांची ही राजकीय घौडदौड रोखण्यासाठीच विरोधकांनी जाणूनबुजून निराधार आरोप करत त्यांच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण केला, असा आरोपही मल्हार पाटील यांनी केला.
षडयंत्र रचणारे ‘ते’ प्यादे कोण? योग्य वेळी नाव समोर आणणार: आ. राणाजगजीतसिंह पाटील
या खटल्याच्या निकालानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप केले आहेत. “या दुर्दैवी हत्याकांडाशी डॉ. पाटील यांचा कोणताही संबंध नसताना अत्यंत खालच्या पातळीचे राजकीय षडयंत्र रचले गेले. या प्रकरणात अतिशय चुकीची आणि धादांत खोट्या विधाने केली गेली. हे षडयंत्र कोणी केले, का केले आणि यात कोणकोण प्यादे (मोहरे) होते, याचा टप्प्याटप्प्याने योग्य वेळी पुरावांसहित पर्दाफाश करू,” असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, २००६ साली ही दुर्दैवी घटना घडल्याच्या दुसऱ्या महिन्यापासूनच याचे घाणेरडे राजकारण सुरू झाले. काही लोक कोणाच्या तरी सांगण्यावरून या कटकारस्थानाला बळी पडले आणि त्यांनी या घटनेचा पुरेपूर राजकीय वापर करून घेतला. हे षडयंत्र कधी, कसे आणि कशासाठी रचले गेले, याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. मात्र, ती माहिती कधी समोर आणायची आणि जनतेला पर्याप्त पुरावे कधी द्यायचे, याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन.
जनतेचा विश्वास कायम; मोहिमेला मोठा प्रतिसाद
न्यायालयाच्या निकालानंतर धाराशिव जिल्ह्यात पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आता ‘सत्यमेव जयते… साहेब’ या पोस्टर मोहिमेच्या माध्यमातून डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित होत असून, या मोहिमेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
