धाराशिव | यशश्री अपडेट्स (प्रतिनिधी): येथील स्थानिक अध्यापक महाविद्यालयात (डी.एल.एड.) प्रभारी प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट, मनमानी कारभार आणि हुकूमशाहीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने आज महाविद्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा दुप्पट रक्कम वसूल करून गेल्या ८ वर्षांत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप अभाविपने केला असून, दोषी प्राचार्यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.
८ वर्षांत २५ लाखांहून अधिक रुपयांचा घोटाळा?
शासनाच्या नियमानुसार डी.एल.एड. (D.El.Ed.) अभ्यासक्रमासाठी वार्षिक ३,३०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून तब्बल ६,५०० रुपये बेकायदेशीरपणे उकळले जात आहेत. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३,२०० रुपये जादा वसूल केले जात आहेत.
गेल्या ८ वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, या कालावधीत सुमारे २५ लाख ६० हजार रुपयांहून अधिक रकमेची लुटमार झाल्याचा प्राथमिक अंदाज अभाविपने वर्तवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व विशेष ऑडिट (लेखापरीक्षण) करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
पावती मागितल्यास विद्यार्थ्यांना धमकावले जाते!
“विद्यार्थ्यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा ३,२०० रुपये अधिक घेतले जातात. धक्कादायक बाब म्हणजे, या अतिरिक्त घेतलेल्या रकमेची कोणतीही अधिकृत पावती विद्यार्थ्यांना दिली जात नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने किंवा पालकाने पावतीची मागणी केली, तर त्यांना अंतर्गत गुणांमध्ये (Internal Marks) नापास करण्याची किंवा प्रवेश रद्द करण्याची धमकी महाविद्यालय प्रशासनाकडून दिली जाते.” — भार्गव मंजुळे, अभाविप शहर मंत्री, धाराशिव
मुलींचे मोफत शिक्षण आणि प्रशासनाची दुरावस्था!
आंदोलनादरम्यान बोलताना अभाविपच्या धाराशिव जिल्हा सह-संयोजक कु. साक्षी पाटील यांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर टीका केली. त्या म्हणल्या:
- घोषणा विरुद्ध वास्तव: शासन एकीकडे मुलींना मोफत आणि सवलतीचे शिक्षण देण्याच्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे अशा महाविद्यालयांमध्ये मुलींची आर्थिक आणि मानसिक दुरावस्था केली जात आहे.
- सर्वसामान्यांची लूट: या महाविद्यालयात अतिशय दुर्गम आणि सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारण्याचे पाप येथील प्रभारी प्राचार्य करत आहेत. हे अभाविप कधीही खपवून घेणार नाही.
अभाविपचा थेट इशारा: पैसे व्याजासह परत मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार!
आंदोलनादरम्यान अभाविपचे शहर मंत्री भार्गव मंजुळे यांनी प्राचार्यांच्या दालनात जाऊन त्यांना थेट ताकीद दिली. “तुम्ही जर चौकशीत दोषी आढळून आलात, तर विद्यार्थ्यांकडून घेतलेले वाढीव शुल्क तुम्हाला व्याजासह परत करावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.
जोपर्यंत संबंधित प्रभारी प्राचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, त्यांचे निलंबन होत नाही आणि विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा अभाविपने दिला आहे.
या आंदोलनात अभाविपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी आणि त्रस्त पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता उच्च शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
