भूकंपाच्या धक्क्यांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; धाराशिव जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही; हिंगोलीतील भूकंपाचे पडसाद उमटल्याची शक्यता

यशश्री अपडेट्स (धाराशिव प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात आज, गुरुवार २ जुलै रोजी सकाळी काही भागांमध्ये भूगर्भातून गूढ आवाज आल्याची आणि भूकंपासदृश सौम्य धक्का जाणवल्याची चर्चा नागरिकांमध्ये पसरली होती. या माहितीची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून (NCS) संपूर्ण परिस्थितीची पडताळणी केली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसून नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हिंगोलीत ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप

राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आज सकाळी १०:१४ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील कामटी तांडा येथे ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही भागांत नागरिकांना ऐकू आलेला गूढ आवाज आणि जाणवलेला सौम्य धक्का हा हिंगोली जिल्ह्यात झालेल्या याच भूकंपाचा परिणाम (पडसाद) असू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन:

“धाराशिव जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही स्वतंत्र किंवा अधिकृत नोंद झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून येणाऱ्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये. केवळ जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीलाच प्राधान्य द्यावे व त्याचे पालन करावे.”
जिल्हा प्रशासन, धाराशिव

Leave a Reply

error: Content is protected !!