प्रत्येक फलाटावर हाय-मेगापिक्सल कॅमेरे बसवण्याची प्रवाशांची मागणी; गृहपाठ आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज
यशश्री अपडेट्स:
धाराशिव (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्हा मुख्यालय असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. बस स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स, तसेच पुरुषांचे खिसे कापण्याच्या घटनांमध्ये दिवसाढवळ्या मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोऱ्या रोखण्यासाठी बस स्थानकात बसवण्यात आलेले ८ सीसीटीव्ही कॅमेरे प्रवाशांपेक्षा चोरट्यांच्याच जास्त मदतीचे ठरत असल्याचे चित्र आहे. हे कॅमेरे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक फलाटावर हाय-मेगापिक्सल कॅमेरे बसवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.
कॅमेऱ्यांची दिशा चुकीची; चोरट्यांचे चेहरे अस्पष्ट
धाराशिव बस स्थानकात प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा प्रत्यय येत आहे. प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कॅमेरे तर लावले आहेत, मात्र त्यांची रचना आणि दिशा अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे.
- बस स्थानकात एकूण २२ फलाट (प्लॅटफॉर्म) आहेत.
- उत्तरेकडील फलाट क्रमांक १ ते १० वरून कळंब, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, बुलढाणा व नागपूर या भागातील बसेस सुटतात.
- दक्षिणेकडील फलाट क्रमांक ११ ते २२ वरून तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, वैराग, बार्शी, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, नळदुर्ग, उमरगा, औसा या मार्गावरील बसेस धावतात.
या दोन्ही बाजूंच्या फलाटांवर आतील आणि बाहेरील बाजूस कॅमेरे बसवले आहेत. परंतु, बाहेरील बाजूचे कॅमेरे थेट दोन्ही टोकांना लावण्यात आल्याने, बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांचे चेहरे खूप लांबून आणि अस्पष्ट दिसतात. याच तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा घेत चोरटे महिलांचे दागिने, विद्यार्थिनींचे मोबाईल आणि प्रवाशांचे खिसे कापून सहज पसार होत आहेत. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनाही तपासात अडचणी येत आहेत.
झरेगावच्या वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल
अशाच एका घटनेत ३० जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ११ वर धाराशिव-वैराग ही बस लागली होती. या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील गंगाबाई मारुती संकपाळ (वय ६७ वर्षे) या आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. या गर्दीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व सोन्याचे पान असलेली माळ हातोहात लांबवली.
याप्रकरणी गंगाबाई संकपाळ यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसल्याने चोरट्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
पोलीस बंदोबस्तासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज!
धाराशिव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथील बस स्थानकात रात्रंदिवस प्रवाशांची मोठी वर्दळ असते. बस स्थानक परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. परंतु, प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत तैनात पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध पोलिसांची देखरेख ठेवताना मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून कडक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
प्रवाशांची प्रमुख मागणी:
चोऱ्यांच्या वाढत्या आलेखाला ब्रेक लावण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने आदेश देऊन, बस स्थानकातील सर्व २२ फलाटांवर थेट बसच्या दरवाजाकडे रोखलेले ‘हाय-मेगापिक्सल सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवावेत, जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल.
