थायलंडमध्ये नोकरीचे आमिष; धाराशिवच्या तरुणाला कैद करून ऑनलाईन फ्रॉडसाठी छळ!

यशश्री अपडेट्स|धाराशिव|

फेसबुकवरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातीला भुलून थायलंडला गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणाला तिथे डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाचे अपहरण करून त्याला परदेशात बंधक बनवण्यात आले असून, त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन सायबर फसवणुकीची (Cyber Fraud) कामे करून घेतली जात आहेत. नकार दिल्यास त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात एजंट्स आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरील जाहिरात पडली महागात

मिळालेल्या माहितीनुसार, खेड (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड (वय २५) यांचा लहान भाऊ अनिकेत हरिश्चंद्र गरड (वय २२) हा नोकरीच्या शोधात होता. यादरम्यान त्याने फेसबुकवर थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची एक जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवरील दिलेल्या क्रमांकावर अनिकेतने संपर्क साधला. त्यानंतर काही अज्ञात मोबाईलधारक आणि एजंटांनी संगनमताने त्याला मोठ्या पगाराचे आणि सुखसोयींचे आमिष दाखवून थायलंडला जाण्यास प्रवृत्त केले.

१ मे पासून तरुणाला बनवले बंधक

अनिकेत एजंटांच्या सांगण्यावरून थायलंडला पोहोचला खरा, मात्र तिथे पोहोचताच त्याचे स्वप्न भंगात निघाले. आरोपींनी त्याला नोकरी देण्याऐवजी एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. १ मे २०२६ पासून त्याला तिथे बंदी बनवण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी करणाऱ्या टोळीसाठी त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची कामे करून घेतली जात आहेत. त्याला मायदेशात परत येऊ न देता, त्याचा छळ केला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

भावाचा परदेशात छळ होत असल्याचे आणि तो मोठ्या संकटात सापडल्याचे समजताच, ज्ञानेश्वर गरड यांनी ३ जुलै २०२६ रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात आरोपी आणि एजंटांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे:

  • कलम १२७(२), १२७(४): बेकायदेशीर डांबून ठेवणे / अपहरण करणे
  • कलम १४३: मानवी तस्करी (Human Trafficking)
  • कलम ३१८(४): फसवणूक करणे
  • कलम ६१(२): गुन्हेगारी कट रचणे
  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act): कलम ६६(C) आणि ६६(D) (सायबर फसवणूक आणि ओळख चोरी)

सायबर पोलिसांचे आवाहन

या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावण्यासाठी आणि अडकलेल्या तरुणाची सुटका करण्यासाठी धाराशिव सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाची सूचना: सोशल मीडियावरील परदेशातील नोकरीच्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये. कोणत्याही अनधिकृत एजंटला पैसे किंवा पासपोर्ट देऊ नका. कंपनीची अधिकृतता पडताळल्याशिवाय परदेश प्रवास टाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *