यशश्री अपडेट्स-धाराशिव (प्रतिनिधी) :
धाराशिव : उस्मानाबाद–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे नाव या जागेसाठी प्रमुख दावेदारांमध्ये अग्रस्थानी मानले जात असताना, त्यांच्या एका व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दत्ता कुलकर्णी यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो पोस्ट करत त्यासोबत, “कुणाशीच साधू नये जवळीक इतकी की दूर जाता; घाव काळजावर होईल” असा आशय व्यक्त केला आहे. या संदेशाचा नेमका संदर्भ काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी त्यामागे काही राजकीय संकेत दडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सध्या उस्मानाबाद–बीड–लातूर विधान परिषद मतदारसंघासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांत संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क आणि तीनही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी असलेले मजबूत संबंध यामुळे दत्ता कुलकर्णी यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहे.
अशा परिस्थितीत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आलेल्या या स्टेटसकडे राजकीय निरीक्षकांनी विशेष लक्ष दिले आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते हा संदेश पक्षांतर्गत घडामोडींशी संबंधित असू शकतो, तर काहींच्या मते विरोधकांना किंवा राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणाऱ्या घटकांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा असू शकतो.
सोशल मीडियावरही या पोस्टची जोरदार चर्चा सुरू असून अनेकजण त्याचे विविध राजकीय अर्थ काढताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये या पोस्टने आणखी उत्सुकता निर्माण केली आहे.
दरम्यान, भाजपकडून अद्याप या मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे दत्ता कुलकर्णी यांच्या या स्टेटसचा आगामी उमेदवारीशी काही संबंध आहे का, की हा केवळ वैयक्तिक भावना व्यक्त करणारा संदेश आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
आता भाजपच्या उमेदवार घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यानंतरच या चर्चांमागील वास्तव स्पष्ट होणार आहे.
