ड्रग्ज तस्करीतील आरोपीच्या जामिनानंतर जल्लोष; गुंडगिरी खपवून घेणार नाही! पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश

मकोका, तडीपारीसारखी कठोर कलमे लावा; गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढा – सरनाईकांचा इशारा

जामिनानंतर बाइक रॅली, फटाक्यांची आतषबाजी आणि सोशल मीडियावर डॉनगिरीचे रिल्स; तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामाबाबत पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करी आणि वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याचे समर्थकांकडून करण्यात आलेले जल्लोषात स्वागत, मोटारसायकल रॅली, फटाक्यांची आतषबाजी आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले डॉनगिरीचे रिल्स यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, मकोका आणि तडीपारीसारख्या तरतुदींचा कायद्यानुसार विचार करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

धाराशिव येथे पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुन्हेगारी प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयाकडून जामीन मिळणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्याचे जणू काही मोठे पराक्रम केल्याप्रमाणे स्वागत करणे, मिरवणुका काढणे, फटाके फोडणे आणि सोशल मीडियावर स्वतःला डॉन किंवा शहराचा मालक म्हणून सादर करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटनांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होते. त्याचा परिणाम विशेषतः तरुण पिढीच्या मानसिकतेवर होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

जामिनानंतर कळंबमध्ये जल्लोष; सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस

परभणीनंतर धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणाने जिल्ह्यात मोठी चर्चा निर्माण केली आहे. या प्रकरणात नगरसेवक मोहसीन मिर्झा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून कळंब शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या शहरातील आगमनानिमित्त सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडिओंचा अक्षरशः पाऊस पडला.

या व्हिडिओंमध्ये ‘आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला’, ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’, ‘बाप तो बाप रहेगा’, ‘सगळं मार्केट आपलं आहे’, ‘कळंबचा मालक आला कळंब चालवायला’, ‘किंग ऑफ कळंब’, ‘वाघ आला’, ‘आला भाई वापस’, ‘डॉन बाप’ अशा घोषवाक्यांचा आणि गाण्यांचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. काही रिल्समध्ये मिरवणुकीचे दृश्य, पोलिस वाहनातून बाहेर येतानाचे व्हिडिओ, न्यायालय परिसरातील चित्रफिती तसेच जुने-नवे व्हिडिओ वापरण्यात आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावरील दृश्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

गुन्हेगारी प्रकरणातील आरोपीच्या जामिनानंतर अशा प्रकारे व्यक्तीचे उदात्तीकरण करणे आणि स्वतःला डॉन किंवा शहराचा सर्वेसर्वा म्हणून सादर करणे यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘माझेही डोके फिरले’; पालकमंत्र्यांचा संताप

या प्रकाराबाबत बोलताना पालकमंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, काही समाजसेवकांनी मला हे व्हिडिओ पाठवले. ते पाहिल्यानंतर माझेही डोके फिरले. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्या जिल्ह्यात अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि त्यांच्या गुंडगिरीला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.

गुन्हेगार म्हणून जेलमध्ये गेलेले लोक जामिनावर बाहेर आल्यानंतर मोटारसायकल रॅली काढतात, फटाके फोडतात आणि जल्लोष करतात. त्यातून आपण काहीतरी मोठा पराक्रम केला आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रकारच्या घटनांमुळे तरुण वर्ग गुन्हेगारीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. समाजात गुन्हेगारीला प्रतिष्ठा मिळत असल्याचा चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मकोका आणि तडीपारीसारख्या कारवाईचे निर्देश

गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. संबंधित व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी करून कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कलमे लावावीत. आवश्यक पुरावे आणि कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास मकोका तसेच तडीपारीसारख्या कारवाईचा विचार करावा, असे निर्देश त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्याचे सांगितले.

‘मी पालकमंत्री असेपर्यंत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना डोके वर काढू देणार नाही. कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती ठेचून काढली पाहिजे,’ असा ठाम इशाराही सरनाईक यांनी दिला.

ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास; नऊ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र

कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात एकूण नऊ आरोपींचा समावेश असून, पोलिसांनी या प्रकरणात जवळपास दीड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. नगरसेवक मोहसीन मिर्झा यांना सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर कळंब येथील संबंधित गुन्ह्यातही आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार त्यांच्यावर ड्रग्ज विक्रीत सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.

धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही संशयित व्यक्ती पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख आणि सहायक सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली.

‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव आणि ड्रग्जविरोधात पालकमंत्र्यांची भूमिका

धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक वातावरण निरोगी राहावे, तरुण पिढी व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीपासून दूर राहावी, यासाठी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ‘कला केंद्र मुक्त’ धाराशिव आणि ड्रग्जविरोधी मोहिमेच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली आहे. समाजाला पोखरणाऱ्या अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष परिणाम दिसतील अशा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीकडे ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे आरोपींच्या जामिनानंतर होणारे शक्तिप्रदर्शन आणि सोशल मीडियावरील डॉनगिरीचे प्रदर्शन हा प्रशासनासमोरील नवा प्रश्न ठरत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते, संबंधित व्हिडिओंची चौकशी होते का आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!