आधुनिक लहुजी सेनेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात; समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीचे आवाहन

यशश्री अपडेट्स|धाराशिव : ‘आधुनिक लहुजी सेना’ या सामाजिक संघटनेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा धाराशिव शहरातील आर्यन फंक्शन हॉल येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. यावेळी त्यांनी मातंग समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट, शिक्षण आणि संघटनात्मक ताकद आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनीलभाऊ कांबळे, आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापिका श्रीमती नगिनाताई कांबळे, प्रदेशाध्यक्ष सोमनाथभाऊ क्षीरसागर यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मातंग समाज हा प्रामाणिक, निरुपद्रवी आणि लढवय्या समाज म्हणून ओळखला जात असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उभारणीत तसेच सैन्यात मातंग समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

रायगडावर तोफ चढविणारे ‘सर्जेराव’ तसेच बाजी पासलकरांचे सहकारी ‘येल्या’ यांसारख्या शूर व्यक्तींच्या योगदानाची आठवण करून देत समाजाचा शौर्य आणि संघर्षाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील ऐतिहासिक वारसा, महापुरुषांचे विचार आणि संघर्षाची परंपरा जपून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकांचे काम प्रगतीपथावर

आद्यक्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी देशात अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जनजागृती आणि संघर्षाची ज्योत पेटवली. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे शासनाच्या वतीने भव्य स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे मा.आमदार ठाकूर यांनी सांगितले.

समाजातील तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून, बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’च्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि प्रशासकीय सेवांमध्ये पुढे जाण्यासाठी संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजाला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नगिनाताई कांबळे यांच्या कार्याला बळ देण्याचे आवाहन

आधुनिक लहुजी सेनेचे संस्थापक आणि समाजातील संघर्ष योद्धा, समाजभूषण स्वर्गीय सोमनाथभाऊ कांबळे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नांसाठी कार्य सुरू ठेवले आहे. स्व. सोमनाथभाऊ कांबळे यांनी पाहिलेले समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगिनाताई कांबळे प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्यांच्या या सामाजिक कार्याला समाजबांधवांनी एकजुटीने बळ द्यावे आणि समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.

समाजरत्न, संघर्ष योद्धा पुरस्कारांनी गुणवंतांचा गौरव

वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘संघर्ष योद्धा’ आणि ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून आधुनिक लहुजी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण, महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देत आधुनिक लहुजी सेनेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

error: Content is protected !!