विधी महाविद्यालयात वर्गात घुसून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विद्यार्थ्याला कॉलर पकडून जिन्यावरून ओढत नेल्याचा तक्रारीत दावा; विद्यार्थिनीने आरोप फेटाळून स्वतःच्या विनयभंगाचा दावा केला

यशश्री अपडेट्स | धाराशिव : धाराशिव शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात इम्तियाज शेख आणि त्याच्यासोबत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीने या प्रकरणातील आरोप फेटाळून आपल्यासोबत विनयभंग झाल्याचा दावा केला असून, या प्रकरणात आपल्या वडिलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.

नेमकी घटना काय घडली ?

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी महाविद्यालयात ‘कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी’च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास इंटरव्हल दरम्यान सुरज सुहास काशिद हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत वर्गात बसला होता.

यावेळी शेख चाँद सुलताना या दोन व्यक्तींसोबत महाविद्यालयात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी एका व्यक्तीने सुरज काशिद याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर संबंधित व्यक्तींनी सुरजला वर्गाबाहेर आणून त्याची कॉलर पकडत जिन्यावरून खाली ओढत नेले तसेच अश्लील शिवीगाळ केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयाच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांनी केली मध्यस्थी

घटना सुरू असताना प्रबुद्ध गायकवाड या विद्यार्थ्याने तसेच महाविद्यालयातील शिपाई बशीर अत्तार यांनी मध्यस्थी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरज काशिद याची संबंधित व्यक्तींच्या तावडीतून सुटका झाल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी सुरज काशिद आणि प्रबुद्ध गायकवाड यांचे मोबाईलमध्ये फोटो काढले आणि, “आम्ही तुमचे फोटो काढले आहेत, बाहेर आल्यावर बघून घेऊ,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्राचार्यांच्या तक्रारीवरून गुन्हा

या घटनेनंतर महाविद्यालयातील शांतता व शिस्तीचा भंग झाल्याचा उल्लेख करत प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी इम्तियाज शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ११५(२), १९४(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन पवार करीत आहेत.

विद्यार्थिनीची वेगळी बाजू

दरम्यान, या प्रकरणातील विद्यार्थिनी शेख चाँद सुलताना यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीतील आरोपांना वेगळी बाजू मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरज सुहास काशिद आणि प्रबुद्ध गायकवाड हे आपली छेडछाड करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

३० सप्टेंबर रोजी आपला विनयभंग झाल्याचे सांगत, या घटनेनंतर आपण रडू लागलो आणि आपल्या पतीला फोन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर पती महाविद्यालयात आले आणि सुरज काशिद याला पोलीस ठाण्यात चल, असे सांगत असल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचा दावाही त्यांनी केला.

“माझ्या पतीने सुरज काशिद याला मारहाण केलेली नाही. माझे पती महाविद्यालयात आले त्यावेळी प्रबुद्ध गायकवाड उपस्थित नव्हता. तसेच माझे वडील इम्तियाज शेख हे देखील घटनास्थळी उपस्थित नव्हते. तरीही माझ्या वडिलांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे शेख चाँद सुलताना यांनी सांगितले.

पोलिस तपासाकडे लक्ष

एकाच घटनेबाबत महाविद्यालय प्रशासनाची तक्रार आणि संबंधित विद्यार्थिनीने मांडलेली वेगळी बाजू समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. नेमकी घटना कोणत्या परिस्थितीत घडली, मारहाण झाली का, तसेच विद्यार्थिनीने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे जबाब आणि उपलब्ध इतर पुरावे तपासानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!