भाजपाच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला? प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची बैठक आता ‘रायगड’वर

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात भाजपमधील जुना-नवा वाद अधिक तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची गुरुवारी होणारी बैठक रायगड फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाकडून ही नियमित संघटनात्मक बैठक असल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

भाजपमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मते, ही बैठक केवळ संघटनात्मक न राहता निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होण्याचे व्यासपीठ ठरू शकते. विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या एका स्टेट्समुळे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचा दावा काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्या स्टेट्सचा अर्थ ‘आमच्यामुळेच जिल्ह्यात भाजप आहे’ असा घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला की, अर्चना पाटील आणि त्यांचा परिवार भाजपमध्ये येण्यापूर्वीही उमरगा पंचायत समिती, परांडा नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळे पक्षाची उभारणी केवळ एका गटामुळे झाली, असा संदेश जाणे कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला धक्का देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात “हा पक्ष कुण्या एका कुटुंबाचा नाही,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.

यापूर्वी जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली नसल्याची नाराजीही समोर आली होती. तसेच जुन्या कार्यकर्त्यांची तिकिटे कापून काही समर्थकांना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप पाटील परिवारावर काही कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राजकारणात काही जागांवर ठरवून पराभव घडवून आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

काही पदाधिकाऱ्यांनी असा आरोपही केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला उत्तर देण्यापेक्षा पाटील परिवारावर टीका करणाऱ्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे निर्देश दिले जात होते. या सर्व बाबींबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे.

सुनील राणे यांचा दौरा पूर्वनियोजित आणि नियमित असल्याचे पक्षाकडून सांगितले जात असले, तरी जिल्ह्यातील निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या बैठकीत पक्षातील नाराजी, संघटनात्मक प्रश्न आणि कार्यकर्त्यांच्या भावना यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!