इंदापुरात ‘ऑपरेशन लोटस’चा ट्विस्ट; मतभेद उफाळले, मुंबईची गाडी धाराशिवकडे वळली!

धाराशिवमधून ‘एक’मताने निघाले, वाटेतच मतभेद उफाळले; राजकीय चर्चांना आले उधाण

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना सोमवारी अचानक नाट्यमय वळण मिळाले. मातोश्रीवरील बैठकीला उद्धवसेनेचे काही नगरसेवक गैरहजर राहिल्यानंतर शहरात सुरू झालेल्या कथित ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला आता इंदापुरातच ब्रेक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईच्या दिशेने एकत्र निघालेले चार नगरसेवक इंदापूर येथे थांबल्यानंतर त्यांच्यातील मतभेद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर चौघांची मोट फुटली आणि तिघांनी मुंबईचा प्रवास अर्ध्यावरच थांबवत पुन्हा धाराशिवची वाट धरल्याची माहिती आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ‘अर्थ’पूर्ण संदेश आणि विविध राजकीय चर्चांना उधाण आल्याने या घडामोडींना आणखी रंग चढला. परिणामी, मुंबईकडे निघालेली गाडी पुन्हा धाराशिवच्या दिशेने वळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एका अनुभवी नगरसेवकाने आपली भूमिका कायम ठेवत भाजपचे मल्हार पाटील यांच्या विश्वासू सहकाऱ्यासोबत मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ला तूर्त ब्रेक लागला असला, तरी धाराशिव पालिकेतील राजकीय हालचाली थांबलेल्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

मातोश्रीवरील बैठकीनंतर चर्चांना सुरुवात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील नगरसेवकांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला धाराशिव शहरातील काही नगरसेवक गैरहजर राहिल्याने त्याच दिवसापासून पालिकेतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर कळंब नगरपालिकेतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

उद्धवसेनेतील नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करावा, यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही काही नगरसेवकांशी चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच काळात काही नगरसेवकांनी आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित करत भाजपमध्ये जाण्याची भूमिका मांडल्याचे बोलले जात आहे. मात्र, सर्वच नगरसेवकांची भूमिका एकसारखी नसल्याने ‘तळ्यात-मळ्यात’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

सोमवारी मुंबईकडे निघाली गाडी

या चर्चांना सोमवारी अचानक वेग आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास चार नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे मल्हार पाटील यांच्या विश्वासू सहकाऱ्याने एका नगरसेवकाला सोबत घेतले, तर उपनगराध्यक्षांनी अन्य तिघांना सोबत घेत मुंबईकडे कूच केल्याची चर्चा आहे. यातील एक नगरसेवक यापूर्वीच पुण्यात असल्याचेही सांगितले जात आहे.

धाराशिवमधून निघालेली ही राजकीय ‘गाडी’ इंदापुरात पोहोचल्यानंतर मात्र परिस्थिती बदलल्याचे बोलले जात आहे. दोन नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने एकत्रितपणे मुंबईकडे जाण्याचा निर्णय डळमळीत झाला. त्यातच सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश फिरू लागल्याने काही नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

‘हे सर्व अंगाशी येणार नाही ना?’; तिघांची माघार

इंदापुरातील घडामोडींनंतर काही नगरसेवकांमध्ये आपण घेत असलेला निर्णय भविष्यात अडचणीचा ठरणार नाही ना, अशी धाकधूक निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच तिघांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय बदलल्याचे सांगितले जात आहे.

परिणामी, मुंबईच्या दिशेने निघालेली गाडी पुन्हा धाराशिवच्या दिशेने वळली. मात्र, अनुभवी नगरसेवकाने आपली भूमिका बदलली नाही. भाजपच्या विश्वासू सहकाऱ्यासोबत त्यांनी मुंबईचा प्रवास सुरू ठेवल्याची चर्चा आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे एकत्रितपणे पक्षांतराचा निर्णय घेण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांमध्येच परस्परांवर किती विश्वास आहे, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

चार नगरसेवक एकत्र आले तर कायदेशीर पेच?

धाराशिव नगरपालिकेत उद्धवसेनेचे एकूण सात नगरसेवक असल्याची चर्चा आहे. त्यापैकी दोन नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. उर्वरित नगरसेवकांपैकी एकाची भूमिका अद्याप स्पष्ट नसून तो ‘तळ्यात-मळ्यात’ असल्याचे राजकीय चित्र आहे.

अशा परिस्थितीत उर्वरित चार नगरसेवकांनी एकत्रितपणे पक्षांतराचा निर्णय घेतल्यास आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी त्याविरोधात कायदेशीर मार्ग स्वीकारला, तर संबंधित नगरसेवकांसमोर पक्षांतरविरोधी कायदेशीर तरतुदींचा पेच निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकत्रित निर्णय घेण्यापूर्वी नगरसेवकांकडून कायदेशीर बाजू तपासली जात असल्याचेही बोलले जात आहे.

मात्र, या कायदेशीर बाबींचा अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरण किंवा न्यायालयीन प्रक्रियेतच होऊ शकतो. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांकडे राजकीय घडामोडी म्हणूनच पाहिले जात आहे.

भाजपमध्ये नव्यांची भरती; जुन्यांची नाराजी?

धाराशिव नगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याचे राजकीय चित्र आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला सध्या सत्ता टिकवण्यासाठी बाहेरच्या नगरसेवकांची गरज नसतानाही विरोधी पक्षातील नगरसेवकांना प्रवेश देण्याच्या चर्चेमुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजीची कुजबुज सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवून भाजपसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकीय संघर्ष केला, त्याच पक्षातील नगरसेवकांना आता सत्ताधारी पक्षात प्रवेश दिला जाणार असेल, तर जुन्या कार्यकर्त्यांचे स्थान काय राहणार? असा सवाल काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे नगरसेवकांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे केवळ पालिकेतील राजकीय समीकरणेच बदलणार नाहीत, तर भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘ऑपरेशन लोटस’ला तूर्त ब्रेक; मात्र खेळ संपलेला नाही!

इंदापुरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा तूर्त थंडावल्याचे चित्र आहे. चार नगरसेवक एकत्र मुंबईकडे निघाले, मात्र वाटेतच मतभेद निर्माण झाले आणि तिघांनी माघार घेतली. त्यामुळे अपेक्षित पक्षप्रवेशाचा निर्णय पुढे ढकलला गेल्याचे मानले जात आहे.

मात्र, एका अनुभवी नगरसेवकाचा मुंबईचा प्रवास सुरूच राहिल्याने राजकीय पडद्यामागील हालचाली पूर्णपणे थांबल्या आहेत, असे म्हणणे घाईचे ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या नगरसेवकांची भूमिका काय राहते, कोण कोणासोबत राहते आणि कोणता गट नेमका कोणती राजकीय भूमिका घेतो, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव नगरपालिकेतील सत्तेची समीकरणे सध्या भाजपच्या बाजूने असली, तरी विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या संभाव्य प्रवेशामुळे पालिकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापुरात गाडी फिरली असली, तरी ‘ऑपरेशन लोटस’चा राजकीय प्रवास खरोखर थांबला की नव्या मार्गाने पुन्हा सुरू होणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!