‘पद ही प्रतिष्ठा नसून जबाबदारी’; सामाजिक कार्यातून जीवन सार्थकी लावण्याचा संदेश
यशश्री अपडेट्स | धाराशिव
रुईभर, दि. २४ ऑगस्ट : प्रत्येकाने आपले कर्म प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहावे. माणसाची खरी ओळख त्याच्या पदाने नव्हे, तर त्याने समाजासाठी केलेल्या कार्यातून निर्माण होते. समाजातील गरजू, वंचित आणि अडचणीत असलेल्या घटकांच्या मदतीसाठी सदैव पुढे राहून सकारात्मक दृष्टिकोन व निस्वार्थ वृत्ती जोपासली, तर समाजासाठी केलेले कार्यच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सार्थक बनवते, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा सत्कारमूर्ती रामदास अण्णा कोळगे यांनी केले.
जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी फेरनिवड झाल्याबद्दल रामदास अण्णा कोळगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्या फेरनिवडीबद्दल परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
रामदास अण्णा कोळगे म्हणाले की, समाजातील लोकांची साथ, विश्वास आणि प्रेम हीच सामाजिक कार्याची खरी ताकद आहे. कोणतेही पद मिळाल्यानंतर त्या पदाचा उपयोग स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे. सामाजिक विकासाचा विचार केंद्रस्थानी ठेवून सातत्याने काम केल्यास अनेक सकारात्मक बदल घडवून आणता येतात.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करताना पक्षाच्या आदेशानुसार जबाबदारी पार पाडण्याबरोबरच समाजसेवेतही कधीही कसूर केली नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न केला. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन काम करताना अनेक चांगले अनुभव मिळाले असून, त्यातूनच पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
“मिळालेले पद ही प्रतिष्ठा नसून जबाबदारी आहे,” असे सांगत कोळगे यांनी भविष्यातही अधिक जोमाने आणि सकारात्मकतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील तरुणांनीही सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार जोपासावा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामदास अण्णा कोळगे यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी नेहमी नम्रपणे वागावे, चांगले शिक्षण घ्यावे, आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे आणि भविष्यात आपल्या शाळेचा, गावाचा व परिसराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
“यश मिळविण्यासाठी परिस्थितीपेक्षा इच्छाशक्ती आणि सातत्य महत्त्वाचे असते. ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर कोणतेही यश अशक्य नाही,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

धनराज महाराज गिरी यांच्या हस्ते सत्कार
भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी फेरनिवड झाल्याबद्दल रामदास अण्णा कोळगे यांचा मठाधिपती धनराज महाराज गिरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे’ या ब्रीदवाक्याचा संदेश
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, परिसरातील कोणत्याही व्यक्तीची नवीन पदावर नियुक्ती किंवा उच्च पदावर बढती झाल्यास संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातो. विद्यार्थ्यांनी अशा व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, हा सत्कारामागील मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अडचणी आल्या म्हणून खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. संस्थेच्या ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे’ या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांनी कृतीशील राहावे, असे आवाहन सुभाष दादा कोळगे यांनी केले.
रामदास कोळगे यांच्या कार्याचा आढावा
प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी रामदास अण्णा कोळगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी निष्ठेने आणि सातत्याने कार्य केले. समाजकल्याणाचा ध्यास घेत त्यांनी निस्वार्थ वृत्तीने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, मृदूभाषी स्वभाव, संयम आणि प्रामाणिकपणा यामुळे रामदास अण्णा कोळगे यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी सांगितले.
यावेळी सुब्राव अण्णा लोमटे, ह.भ.प. शिवाजी बारगुळे आणि ह.भ.प. मधुकर महाराज निंबाळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, रुईभरचे माजी सरपंच बालाजी कोळगे, शिवाजी पवार गुरुजी, पोपट नलावडे गुरुजी, गणपती बप्पा माने, आगतराव भोईटे, ह.भ.प. जगन्नाथ महाराज गव्हाणे, धनाजी चव्हाण, पांडुरंग आप्पा कोळगे, गोपाळ निंबाळकर, प्रकाश भणगे, मारुती कस्पटे, अशोक सिरसाठे, महादेव पवार, अनिल भोईटे, सुनील भोईटे, राजेंद्र भणगे, किशोर कोळगे, बलभीम कस्पटे, शशिकांत कोळगे, शिवाजी काकडे, दत्तात्रय बनसोडे, सहदेव कोळगे, विठ्ठल कोळगे, हरिदास गव्हाणे, निवृत्ती भोईटे, दिलीप भोईटे आदी उपस्थित होते.
तसेच श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले, तर आभार गणेश शेटे यांनी मानले. रामदास अण्णा कोळगे यांच्या फेरनिवडीच्या निमित्ताने झालेल्या या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समाजसेवेची वाटचाल अधिक व्यापक करण्याचा संकल्प
या सत्कार सोहळ्यातून रामदास अण्णा कोळगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला नव्या जबाबदारीची जोड मिळाल्याचे दिसून आले. समाजातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या पुढील कार्यकाळाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
