मराठवाड्याच्या जलसुरक्षेसाठी ओमराजे निंबाळकर आक्रमक; कृष्णा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जाची मागणी

यशश्री अपडेट्स | धाराशिव

कृष्णा मराठवाडा (सिंचन) प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र शासनामार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी ठोस मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि प्रकल्पाचे महत्त्व मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाडा विभाग विशेषतः धाराशिव जिल्हा अनेक वर्षांपासून दुष्काळ, अल्पवृष्टी आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. शेतीचे मोठे क्षेत्र पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक गावांमध्ये गंभीर स्वरूप धारण करत असून टँकरवर अवलंबित्व वाढले आहे. अशा परिस्थितीत कृष्णा मराठवाडा नदीजोड (सिंचन) प्रकल्प हा मराठवाड्याच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल होऊ शकतो.

खासदार निंबाळकर यांनी सांगितले की, या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग वाढेल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. कालवे, धरणे आणि वितरण व्यवस्था यांचे काम वेळेत पूर्ण होऊन पाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. परिणामी सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेती उत्पादनात वाढ, भूजल पातळीत सुधारणा, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पाणीटंचाई, शेतीवरील परिणाम, भूजल घट, दुष्काळी स्थलांतर आणि तरुणांच्या रोजगाराच्या समस्या यासारख्या गंभीर प्रश्नांकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधले. अनेक भागांमध्ये शेती न परवडल्याने शेतकरी कुटुंबांचे शहरांकडे स्थलांतर वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृष्णा नदी खोऱ्यातील उपलब्ध जलसंपत्तीचा नियोजनबद्ध वापर करून मराठवाड्याला दीर्घकालीन जलसुरक्षा देण्यासाठी हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सादर केलेल्या निवेदनाची सकारात्मक दखल घेतली. मराठवाड्याच्या हिताच्या दृष्टीने या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित स्तरावर आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली.

मराठवाड्यातील सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलसुरक्षेच्या दृष्टीने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळावा, ही मागणी आता अधिक जोर धरत असून, या भेटीमुळे या प्रश्नाला केंद्र स्तरावर पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!