परंडा येथे स्वतंत्र ‘दिव्यांग प्रमाणपत्र बोर्ड’ सुरू; दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्याला यश

यशश्री अपडेट्स: परंडा (प्रतिनिधी)
परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, या उद्देशाने ‘दिव्यांग उद्योग समूहा’च्या वतीने करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. परंडा येथे स्वतंत्र दिव्यांग प्रमाणपत्र बोर्ड मंजूर झाले असून, आता या प्रमाणपत्रांचे वितरण उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथून रीतसर सुरू करण्यात आले आहे.

मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा

दिव्यांग उद्योग समूहाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी या न्याय्य मागणीसाठी मंत्रालय स्तर, जिल्हा प्रशासन तसेच दिव्यांग कल्याण विभागाकडे सातत्याने लेखी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. विविध स्तरांवर निवेदने देऊन दिव्यांगांना होणारा शारीरिक व आर्थिक त्रास त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या या अथक प्रयत्नांची दखल घेत अखेर प्रशासनाने परंड्यात स्वतंत्र बोर्डाला मंजुरी दिली आहे.

तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना मोठा दिलासा

यापूर्वी दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामुळे त्यांचा वेळ, पैसा तर वाया जात होताच, शिवाय प्रचंड शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागत होते. आता परंड्यातच हक्काचे बोर्ड कार्यरत झाल्यामुळे तालुक्यातील शेकडो दिव्यांग नागरिकांची पायपीट थांबली असून, त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

“ज्या दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही, त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे संपर्क साधून आपले प्रमाणपत्र मिळवून घ्यावे.”
तानाजी घोडके (राज्याध्यक्ष, दिव्यांग उद्योग समूह)

संघटना हक्कांसाठी कटिबद्ध

“दिव्यांग उद्योग समूह ही संघटना केवळ प्रमाणपत्रापुरती मर्यादित नसून, भविष्यातही दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शासन दरबारी प्रभावीपणे लढा देईल. दिव्यांगांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना आणि सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी संघटना नेहमीच तत्पर आणि कटिबद्ध राहील,” असा विश्वासही तानाजी घोडके यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *