कसबे तडवळे येथे शेतरस्ता मोजणीवेळी शासकीय पथकावर हल्ला; एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

  • ढोकी पोलिसांत तिघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद
  • नायब तहसीलदारांना मारहाण; महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप
    यशश्री अपडेट्स / धाराशिव (प्रतिनिधी):
    धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसबे तडवळे येथे एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. शेतरस्ता मोजणीसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या शासकीय पथकावर स्थानिक कुटुंबाने हिंसक हल्ला केला. या गोंधळात मोजणीला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर एका महिलेने थेट नायब तहसीलदारांनाच मारहाण केली. या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय घडली?

अपर तहसीलदार, धाराशिव यांच्या आदेशानुसार, २५ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कसबे तडवळे येथील गट नंबर ७६ व ७७ च्या उत्तर बाजूच्या बांधावर शेतरस्ता मोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. नायब तहसीलदार एम.जी. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात मंडळ अधिकारी संभाजी जयराम तोगरे, ग्राम महसूल अधिकारी एच.आर. जाधव, आणि महसूल सेवक अमर मुजावर यांचा समावेश होता.
मोजणीची प्रक्रिया सुरू असतानाच स्थानिक रहिवासी विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार आणि श्रीधर विलास पवार यांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला. “रस्ता करू नका, अन्यथा आम्ही पेट्रोल टाकून जिवंत जाळून घेऊ,” अशी धमकी देत त्यांनी मोजणीची टेप लाथ मारून तोडली आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आत्मदहनाचा प्रयत्न आणि अधिकाऱ्यांना मारहाण

दुपारी सव्वा एकच्या सुमारास अचानक काही अंतरावर आरडाओरडा सुरू झाला. उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली असता, आरोपी विलास दत्तात्रय पवार याने स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आले. त्याच्या पॅंटला आग लागलेली असून डावा पाय भाजल्याने तो जखमी झाला होता.
याच गोंधळाचा फायदा घेत आरोपी विमल विलास पवार हिने थेट नायब तहसीलदार शिंदे यांच्या कानशिलात लगावली (श्रीमुखात भडकावली). तर जखमी विलास पवार याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत “तुझ्या घरासमोर येऊन आत्महत्या करेन,” अशी धमकी दिली. पोलिसांनी जखमी विलास पवार याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला आहे.

तिघांवर गंभीर गुन्हे दाखल

याप्रकरणी मंडळ अधिकारी संभाजी जयराम तोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसांनी आरोपी विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार आणि श्रीधर विलास पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३२, २२६, २२१, ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास असिस्टंट सब-इन्स्पेक्टर बापुजी गोपाळराव पुरके करत आहेत.

वरिष्ठ स्तरावरून नियमावली आणि कठोर कारवाईची मागणी

शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकांवर थेट हल्ले करणे आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आत्महत्येसारखे कृत्य करणे या वाढत्या प्रकारांमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. अशा संवेदनशील प्रकरणांची हाताळणी वरिष्ठ स्तरावरूनच एका निश्चित नियमावलीनुसार (SOP) व्हावी, जेणेकरून मैदानी पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहील, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *