ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया; कारवाईसाठी धावलेले पथक ‘रिकाम्या हाताने’ परतल्याने संशय गडद
परंडा (प्रतिनिधी) | यशश्री अपडेट्स
परंडा तालुक्यातील वागेगव्हाण येथील नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या या वाळू चोरीमुळे नदीपात्राचे पूर्णपणे वाटोळे होत असून, महसूल यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच कारवाईसाठी गेलेले महसूल पथक रिकाम्या हाताने परतल्याने, यामागे ‘हप्त्याचा काळा बाजार’ आणि संगनमत असल्याचा संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे.
यंत्रणेची ‘डोळेझाक’ आणि माफियांना अभय?
वाळू चोरी रोखण्याची प्राथमिक जबाबदारी गावचे पोलीस पाटील, संबंधित तलाठी आणि महसूल पथकाची असते. मात्र, वागेगव्हाण येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या उत्खननाकडे या सर्वांनी जाणीवपूर्वक ‘डोळेझाक’ केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळू माफियांना स्थानिक प्रशासनाचे थेट अभय असल्याशिवाय हे धाडस शक्यच नाही, अशी चर्चा आता पंचक्रोशीत रंगली आहे.
ग्रामस्थांचा संतप्त सवाल: “खबऱ्या महसूल विभागातच?”
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू चोरीची माहिती मिळूनही जेव्हा महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी जाते, तेव्हा त्यांना तिथे काहीही सापडत नाही. नेमके पथक पोहचण्यापूर्वीच वाळू माफिया सावध कसे होतात? कारवाईची गुप्त माहिती लीक करणारा खबऱ्या महसूल विभागातच बसला आहे का? की कारवाईसाठी गेलेले पथक केवळ ‘अर्थपूर्ण’ तडजोडीनंतर माघारी फिरते? असे अनेक टोकदार प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.नदीपात्राचे वाटोळे; तात्काळ पंचनाम्याची मागणी
बेकायदेशीर आणि अवाजवी वाळू उत्खननामुळे नदीपात्रात मोठे आणि धोकादायक खड्डे पडले आहेत. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर परिस्थितीचा महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा आणि संबंधित वाळू चोरांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वागेगव्हाणच्या ग्रामस्थांमधून होत आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार ठेवा!
केवळ कारवाईचा देखावा किंवा सोपस्कार पार न पाडता, वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी. तसेच जे दोषी आढळतील, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आक्रमक भूमिका वागेगव्हाणच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. आता यावर वरिष्ठ प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


