यशश्री अपडेट्स : परंडा | प्रतिनिधी
परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील इयत्ता नववी व दहावीच्या २० गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा परंड्याचे सुपुत्र प्रा. अविनाश वाघमारे यांनी सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या पाठ्यपुस्तक संचाचे वाटप करून शैक्षणिक मदतीचा हात दिला आहे.
परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला या दोन्ही शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके खरेदी करणे कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन प्रा. अविनाश वाघमारे यांनी इयत्ता नववी व दहावीच्या एकूण २० विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तक संच उपलब्ध करून दिले.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. मात्र, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वतः पाठ्यपुस्तके खरेदी करावी लागतात. समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या उद्देशाने प्रा. वाघमारे दरवर्षी या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत आहेत. विशेष म्हणजे, प्रा. अविनाश वाघमारे हे परंडा येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत.
पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष फिरोज पठाण, माजी अध्यक्ष आलमगीर सय्यद, मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, शशिकांत माने, नारायण शिंदे, सुभाष भालेराव, आप्पासाहेब बल्लाळ, बाबुधी घाडगे, शुभांगी देशमुख, मीनाक्षी मुंढे, रेखा उसराटे यांच्यासह दोन्ही प्रशालांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन तानाजी मिसाळ यांनी केले तर आभार नामदेव पखाले यांनी मानले.
प्रा. वाघमारे कुटुंबीयांच्या या उपक्रमाबद्दल पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

