परंड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक उत्साहात

यशश्री अपडेट्स : परंडा | प्रतिनिधी

परंडा शहरातील रेस्ट हाऊस येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस धाराशिव जिल्ह्यातील पक्षाचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याबरोबरच आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी, “आम्ही कायम पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत,” अशी ग्वाही दिली.

तसेच जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना आगामी काळात लोकशाही मार्गाने धडा शिकविण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीदरम्यान युवा नेते विश्वजीत आबा पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी, पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. गावागावांत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहरप्रमुख, नगरसेवक, माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक आढावा तसेच पक्ष बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीमुळे परंडा शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष रणजित ज्ञानेश्वर पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *