यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
खासदार ओमराजे निंबाळकर हे नावाप्रमाणेच जनतेच्या मनाचे राजे असून ते रील स्टार नव्हे, तर रिअल स्टार आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना हा निकाल दुर्दैवी व अनपेक्षित असल्याचे सांगत, शिवसेना ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा करत सर्व खासदारांचे स्वागत केले.
“हे सहाही खासदार आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे राहून विजयी होतील,” असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर आणि मामा बाळाजी पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

“ओमराजे हे मनाचे राजे आहेत. काही लोकांनी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्यांना ‘रील स्टार’ म्हटले; मात्र ते खऱ्या अर्थाने जनतेतील रिअल स्टार आहेत. जमिनीवरचा नेता कसा असतो, हे ओमराजे यांच्याकडून शिकावे,” असे शिंदे म्हणाले.
कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाबाबत बोलताना शिंदे यांनी, “त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात लागलेला निकाल दुर्दैवी व अनपेक्षित आहे. या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असे आश्वासन दिले.
यावेळी शिंदे यांनी विरोधकांवरही टीका केली. “आम्ही कोणाला अडवण्यासाठी नाही, तर वाढवण्यासाठी आलो आहोत. मात्र आमच्या आडवे येणाऱ्यांबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आम्ही विसरलेलो नाही,” असे ते म्हणाले.
“आमची नीती आणि नियत स्वच्छ आहे. हिंदुत्वाची विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन देताना शिंदे म्हणाले, “हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी मालक नाही. मी स्वतः कार्यकर्त्याप्रमाणे वागतो. दिलेला शब्द पाळणे हीच आमची ओळख आहे.”
चार वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उठावाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “त्या वेळी आमच्यासोबत ४० आमदार होते. आता आम्ही चौकार नाही, तर थेट षटकार मारला आहे. आमच्याकडे आता सहा ‘टायगर’ आले आहेत.”
मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला


