सावंतांची एन्ट्री अन् ओमराजेंची पत्रकार परिषद; सावंत ठरले ‘किंगमेकर’, ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम फत्ते


यशश्री अपडेट्स : धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड घडत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान माजी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची झालेली दमदार एन्ट्री विशेष चर्चेचा विषय ठरली.
ओमराजे निंबाळकर पत्रकार परिषदेत प्रवेशाबाबत माहिती देत असताना “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. याचवेळी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे आगमन झाले. सावंत यांच्या आगमनानंतर ओमराजे यांनी पत्रकार परिषद काही काळ थांबवत स्वतः पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामागे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर ओमराजेंचा पक्षप्रवेश घडवून आणत सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीही शिवसेनेतील राजकीय घडामोडींमध्ये सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ते ‘किंगमेकर’ ठरल्याची चर्चा रंगली आहे.
यावेळी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले की, “धाराशिव जिल्ह्यातील विकासाचा सात वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्याला अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी घेतला आहे. त्यांच्यामध्ये काम करण्याची प्रचंड तळमळ आहे. सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता म्हणून ते ओळखले जातात. आगामी काळात जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *