ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष; शिंदे गट प्रवेशाच्या चर्चांना उधाण

यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. खासदार निंबाळकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्याहून आपल्या गोवर्धनवाडी या मूळ गावी दाखल होत असून, आज दुपारी ४ वाजता त्यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत ते आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही प्रमुख पदाधिकारी आणि नेते बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा असून, ओमराजे समर्थक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत हे देखील पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. ते भूम-परंडा मतदारसंघातील कार्यक्रम पूर्ण करून खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात असून, गोवर्धनवाडी येथे होणाऱ्या बैठकीतून नेमकी कोणती भूमिका समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *