नियम मोठे की माणुसकी? शवविच्छेदनासाठी मृतदेहाची चार तास हेलपाटे

यशश्री अपडेट्स | परंडा

परंडा तालुक्यातील खानापूर येथील एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तब्बल चार तास फरफट झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृतदेह समोर पडलेला असताना आरोग्य यंत्रणा मात्र “हे आमच्या हद्दीत नाही” या तांत्रिक कारणांमागे लपून जबाबदारी झटकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

खानापूर येथील चैतन्य विकास गटकुळ (वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह परंडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, माणुसकीला हरताळ फासत डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार देत “हे गाव आनाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येते” असा पवित्रा घेतला. परिणामी नातेवाईकांना चार तास मृतदेहासह हेलपाटे मारावे लागले.

मृतदेह पडून, अधिकारी बैठकीत!

एकीकडे मृतदेह रुग्णालयात पडून होता, तर दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी बैठकीत असल्याचे कारण सांगून यंत्रणा हात झटकत होती. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदन करण्यात आले.

सीमारेषांमुळे नागरिकांना मरणयातना

परंडा शहरालगतची खानापूर आणि जामगाव ही गावे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाची बळी ठरत आहेत. गाव जवळ, पण आरोग्य सेवा दूर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिवंतपणी आरोग्य सेवांसाठी धावपळ आणि मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी फरफट, असा संतापजनक अनुभव नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे.

नेत्यांच्या हस्तक्षेपानंतरच यंत्रणा जागी

डॉक्टरांच्या टोलवाटोलवीमुळे परिस्थिती चिघळल्यानंतर भाजपचे सुबोधसिंह ठाकूर यांनी थेट हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरच आरोग्य प्रशासनाला जाग आली आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

प्रश्न अजूनही कायम

परंड्याच्या अगदी जवळ असलेल्या गावांतील नागरिकांना केवळ कागदी सीमांमुळे अशा हालअपेष्टा का सहन कराव्या लागतात? मृतदेहाची अशी हेळसांड मानवतेला काळिमा फासणारी नाही का? परंडा उपजिल्हा रुग्णालयातच खानापूर व जामगावसाठी शवविच्छेदनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करणार की पुन्हा एखाद्या मृतदेहाची अशीच फरफट होणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *