कुंभेफळ ग्रामपंचायत सदस्यांचा लढा यशस्वी? बीडीओंकडून भत्त्याचे आश्वासन

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सदस्य भत्त्याच्या मागणीसाठी कुंभेफळ (ता. परंडा) येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी परंडा पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकारी (बीडीओ) गायकवाड यांची भेट घेतली. सदस्यांच्या ठाम भूमिकेनंतर बीडीओंनी येत्या दोन दिवसांत प्रलंबित मानधन खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२१ मध्ये कुंभेफळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना अद्यापपर्यंत त्यांचा हक्काचा सदस्य भत्ता मिळालेला नाही. याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागला नव्हता.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य पदमीन यादव, कौशल्या नरसू नायकोडे आणि आजूम फकीर पठाण यांनी मंगळवारी परंडा पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी गायकवाड यांच्यासमोर आपली मागणी ठामपणे मांडली. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर गायकवाड यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, “दोन दिवसांच्या आत प्रलंबित सदस्य भत्ते खात्यावर जमा करण्याबाबत आदेश देण्यात येतील,” असे आश्वासन दिले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मानधनाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, दिलेल्या मुदतीत मानधन न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असा इशाराही सदस्यांनी दिला.
या धडक भेटीमुळे परंडा पंचायत समिती परिसरात काही काळ चर्चांना उधाण आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *