यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ४ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक केली आहे. अग्नीशस्त्र प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
दि. १३ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक गस्त घालत होते.
दरम्यान, बेंबळी ते धाराशिव मार्गावरील साळुंखे नगर कमानीजवळ दोन इसम मोटारसायकलवरून जात असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला.
रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संशयित मोटारसायकलवरून येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. आरोपींनी आपली नावे बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, भूम) व आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे (रा. जांब, ता. भूम) अशी सांगितली.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींकडून ४ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सपोनि अमोल मोरे, पोह. समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, मपोह. शोभा बांगर, पोना अशोक ढगारे, चापोअं. दहीहांडे, शेरखाने व पोअ. मुंगळे यांनी सहभाग घेतला.
अवैध शस्त्रसाठ्यावर घातलेला हा मोठा आळा जिल्हा पोलिसांसाठी महत्त्वाचे यश मानले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त, दोघे जेरबंद
