यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव शहरातील भाग्यनगर परिसरात विवाहानंतर अवघ्या महिन्याभरात नववधूने साथीदारांच्या मदतीने पतीच्या घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फसवणूक, खंडणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवराज संग्राम पाटील (वय २८), हे शासकीय कर्मचारी असून त्यांचा विवाह १३ मे रोजी शुभांगी ऊर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले (रा. तेलंगणा) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर पत्नीचे वर्तन संशयास्पद असल्याने त्यांनी तिच्या नातेवाईकांकडे तक्रार केली होती.
दरम्यान, संबंधित नातेवाईकांनी घरी येऊन पत्नीला समजावून सांगण्याचे नाटक केले आणि तिला सोबत घेऊन गेले. मात्र, त्यानंतर घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २७ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.
फिर्यादी शासकीय सेवेत असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांची समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
विसरलेल्या मोबाईलमुळे उघडकीस आला प्रकार
आरोपी निघून गेल्यानंतर घरात बेडखाली एक मोबाईल फोन आढळून आला. तो तपासला असता संबंधित महिलेचे इतर व्यक्तींशी विवाह झाल्याचे फोटो तसेच विवाहासंदर्भातील चॅटिंग आढळून आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री फिर्यादींना झाली.
या प्रकरणाचा अधिक तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत.
