श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; दोन विशेष पथके तैनात

यशश्री अपडेट्स | तुळजापूर (प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. मंदिर परिसरात थुंकणे, कचरा टाकणे किंवा घाण करणाऱ्या व्यक्तींवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे व कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे परिसराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ही कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन शिफ्टमध्ये मंदिर परिसरात गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतील.
या पथकांमध्ये मंदिर संस्थानचे चार शिपाई तसेच सुरक्षा सेवा पुरवठादार कंपनी SISPL चे दोन सुरक्षा रक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. मंदिर परिसरात थुंकणे, घाण करणे अथवा कचरा टाकताना आढळणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी सर्व भाविकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *