परंड्यात 70 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर; 10 ते 12 जूनदरम्यान विशेष ग्रामसभा

यशश्री अपडेट्स | परंडा (प्रतिनिधी):
परंडा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या एकूण 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी 10, 11 आणि 12 जून 2026 रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. राविआ/ग्रापनि-2025/प्र.क्र.-03/का-8, दिनांक 26 मे 2026 अन्वये हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी प्राधिकृत अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली जाहीर करण्यात आलेल्या तारखांना आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
      पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रशासनाचे आवाहन
परंडा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत पूर्णपणे जाहीर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने सर्व लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच ही प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
       आज प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक
आरक्षण सोडत प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवार, दि. 9 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, परंडा येथील सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व प्राधिकृत अधिकारी व सहाय्यक अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *