यशश्री अपडेट्स-परंडा | प्रतिनिधी
परंडा शहरासह ग्रामीण भागात शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारीच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहर व परिसरात बंदी असलेल्या सुगंधित सुपारी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक व विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
शुक्रवार, ५ जून रोजी पहाटेच्या सुमारास सांगली, पुणे, सोलापूर आणि धाराशिव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने परंडा शहरातील तसेच ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर एकाच वेळी अचानक छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यापारी व गुटखा माफियांमध्ये मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी दुकान, गोदामे आणि साठवणूक केंद्रांची तपासणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पथकाने संपूर्ण मुद्देमाल जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शासनाने गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करून अवैध विक्री करत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. त्यानुसार ही संयुक्त कारवाई करण्यात आली असून संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, परंडा परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या नेटवर्कवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. प्रशासनाच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळातही अशाच स्वरूपाच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
“बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. नागरिकांनी अशा अवैध विक्रीबाबत माहिती प्रशासनाला द्यावी,” असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
