यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी
विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई केली आहे. 18 मे ते 4 जून 2026 या कालावधीत विभागाने 146 गुन्हे दाखल करून 126 आरोपींना अटक केली असून 4 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मा. आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान 388.6 बल्क लिटर देशी दारू, 82.44 बल्क लिटर विदेशी दारू, 54 बल्क लिटर बिअर, 5,150 लिटर अवैध हातभट्टी दारू, 40,260 लिटर रसायन तसेच 548 लिटर ताडी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 27.53 लाख रुपये असल्याचे विभागाने सांगितले.
या कालावधीत हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक यासंदर्भातील सर्वाधिक 120 गुन्हे नोंदविण्यात आले असून 101 आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय हॉटेल व ढाब्यांवर कारवाई करत 10 गुन्हे, परराज्यातील मद्यप्रकरणी 5 गुन्हे आणि अवैध ताडी विक्रीप्रकरणी 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला असून धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी 28 मेपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेत 28 मे ते 4 जून 2026 या कालावधीत 83 गुन्हे दाखल करून 70 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 2 वाहने जप्त करण्यात आली असून 309.18 बल्क लिटर देशी दारू, 60.48 बल्क लिटर विदेशी दारू, 54 बल्क लिटर परराज्यातील मद्य, 3,765 लिटर हातभट्टी दारू, 29,500 लिटर रसायन आणि 100 लिटर ताडी जप्त करण्यात आली. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत सुमारे 17.65 लाख रुपये असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
अवैध मद्यनिर्मिती आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी धाराशिव, सोलापूर व लातूर जिल्ह्यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाया सुरू ठेवल्या असून ही मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले.
नागरिकांनी अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले.


