भाजपकडून बसवराज पाटील, तर मविआकडून महेश देशमुख रिंगणात; विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू



यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. महायुतीकडून भाजपचे माजी मंत्री तथा लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे युवा नेते महेश देशमुख यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक होते. त्यामध्ये भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे आणि अरविंद पाटील यांची नावे चर्चेत होती. इच्छुकांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा होती. अखेर रविवारी रात्री भाजपने विधानपरिषदेसाठी जाहीर केलेल्या दहा उमेदवारांच्या यादीत बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला होता. दिवसभर त्यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर रात्री अधिकृत घोषणा झाल्यानंतर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षाने युवा नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांच्यावर विश्वास दाखविला. रविवारी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.


‘कसं जिंकणार माहीत नाही, पण जिंकणारच!’
महेश देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा होताच समर्थकांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. “कसं जिंकणार हे माहीत नाही, पण जिंकणारच!” अशा आशयाच्या स्टेटस आणि पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.


दत्ता कुलकर्णींच्या स्टेटसचीही चर्चा


भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी हे देखील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र उमेदवारी न मिळण्याची शक्यता निर्माण होताच त्यांनी रविवारी व्हॉट्सअॅपवर ठेवलेले एक भावनिक स्टेटस चर्चेचा विषय ठरले.
“कुणाशीच साधू नये जवळीक इतकी की, दूर जाता घाव काळजावर होतील…”
या स्टेटसनंतर पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.


आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून बसवराज पाटील यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर त्यांच्या अर्ज प्रक्रियेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्याने आता उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीची लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *