धाराशिव भाजप आक्रमक; सुजितसिंह ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी महसूलमंत्र्यांकडे साकडे

यशश्री अपडेट्स,परंडा(प्रतिनिधी )

बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ‘फिल्डिंग लावली आहे.

या शिष्टमंडळाने सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. सुजितसिंह ठाकूर यांचा दांडगा जनसंपर्क आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता, या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी त्यांची उमेदवारी अनिवार्य असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुंबईत झालेल्या बैठकीत

जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. यात प्रामुख्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील, धनंजय सावंत (जिल्हा परिषद सदस्य), दत्तात्रय कुलकर्णी (भाजप जिल्हाध्यक्ष), समरजितसिंह ठाकूर (उपनगराध्यक्ष, परंडा), अरविंद रगडे (तालुकाध्यक्ष, परंडा), गौतम लटके, जहीर चौधरी, उमाकांत गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या असून, उमेदवारीबाबतचा हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजते. सुजितसिंह ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यास बीड-लातूर-धाराशिव या तिन्ही जिल्ह्यात भाजपला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *