
यशश्री अपडेट्स-धाराशिव (प्रतिनिधी)
तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळनिहाय पथके सक्रिय;
दोन ठिकाणी कारवाई
धाराशिव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली असून तालुकाभर मंडळनिहाय तपासणी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात येत आहेत.
करजखेडा मंडळातील अवैध गौण खनिज तपासणी पथकाने आज कारवाई करत एक वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत नायब तहसीलदार श्री. शिंदे, मंडळ अधिकारी श्रीमती सुकेशनी कांबळे तसेच मंडळातील ग्राम महसूल अधिकारी सहभागी होते. जप्त करण्यात आलेले वाहन पुढील कार्यवाहीसाठी बेंबळी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे आंबेजवळगा मंडळातील तपासणी पथकानेही अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई केली. मात्र संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत नायब तहसीलदार श्रीमती बलकवडे मॅडम, मंडळ अधिकारी श्री. गुळमिरे तसेच ग्राम महसूल अधिकारी सहभागी होते.
महसूल प्रशासनाने तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये विशेष तपासणी पथके कार्यरत केली असून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे अवैध गौण खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
