परंडा पोलिसांची मोठी मोहीम; अवैध जुगार अड्डे उद्ध्वस्त

यशश्री अपडेट्स,परंडा :

परंडा शहरात सर्वसामान्य जेनतेस उघड्या डोळ्यांनी दिसणारे ७ ऑनलाइन चक्री जुगार आणि २ जुगार अड्डे मागील अनेक दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होते. मात्र, या सर्व प्रकाराबाबत स्थानिक परंडा पोलीस ठाणे पूर्णपणे ‘अनभिज्ञ’ असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अखेर, धाराशिव पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी स्वतः पुढाकार घेत, एकाच वेळी ९ ठिकाणी छापा मारून अवैध धंद्यांचे हे जाळे उद्ध्वस्त केले आहे.
एकाच वेळी ९ जुगार अड्ड्यांवर कारवाई करून पोलिसांनी मोठी मासेमारी केली आहे. या कारवाईत ऑनलाइन चक्री जुगारासाठी वापरले जाणारे संगणक, रोख रक्कम, टेबल, कुलर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहराच्या मुख्य भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना त्यांचा थांगपत्ता कसा लागला नाही? या प्रश्नाने परंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्थानिक पोलिसांच्या या ‘अनभिज्ञते’ची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगली आहे.

धाराशिव जिल्हा विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला विश्वासात न घेता थेट स्वतःच्या विशेष पथकासह धाड टाकण्याचे धाडस दाखवले. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोमवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र भंवर यांच्यासह मुख्यालयातील विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
परांडा शहरातील तरुणाईला विळखा घातला होता. या जुगार अड्ड्यांमुळे अनेक संसार उद्धवस्त होण्याची भीती होती. अशा वेळी, उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे परंडा शहरातील नागरिक मोकळा श्वास घेत आहेत. नागरिकांकडून मोहिते यांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने या प्रकरणातील धागेदोरे तपासाअंती स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *