यशश्री अपडेट्स | धाराशिव :
गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार अथवा रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये. नागरिकांचे बहुतांश शासकीय काम गावातच पूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (६ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. किरण जाधव बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. जाधव यांनी सांगितले की, शासनाने ग्रामस्थांना विविध प्रकारच्या शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांना आवश्यक त्या सेवांसाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करता येतो. त्यामुळे ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांनी केवळ अर्ज स्वीकारण्यापुरती मर्यादित भूमिका न ठेवता नागरिकांना संपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे.
नगरपालिका क्षेत्रातील केंद्रे तातडीने सक्रिय करण्याचे निर्देश
नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने सक्रियपणे कार्यान्वित करावीत, असे निर्देश डॉ. जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील नागरिकांनाही विविध शासकीय सेवांचा लाभ सहज आणि वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जानेवारी ते डिसेंबर या कालावधीतील कामगिरीच्या आधारे महसूल, ग्रामविकास आणि नगरपालिका क्षेत्रातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची उत्कृष्ट केंद्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात धाराशिव जिल्हा निश्चितच चांगली कामगिरी करेल, असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्याने यापूर्वीही विभागात चांगली कामगिरी केली आहे. यापुढे महसूल, ग्रामविकास आणि नगरपालिका या तिन्ही विभागांच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांनी अधिक प्रभावीपणे काम करून नागरिकांना जलद सेवा देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
१,२१२ सेवा ऑनलाइन; अधिकाधिक सेवा ऑनलाइन करण्यावर भर

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत आतापर्यंत १ हजार २१२ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अधिकाधिक शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. जाधव यांनी दिले.
नागरिकांना ऑनलाइन सेवांचा वापर करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सेवा केंद्रांनी मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य करावे. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचविण्यासाठी डिजिटल माध्यमातून सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
९० टक्के सेवा नियत कालावधीत देण्याचे उद्दिष्ट
लोकसेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा ठराविक कालमर्यादेत मिळवून देणे हा आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी किमान ९० टक्के सेवा नियत कालावधीत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आणला तरी त्यांना परत पाठविण्याऐवजी नगरपालिका क्षेत्रात त्यांचा अर्ज ऑनलाइन करून घेण्याची व्यवस्था करावी. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन शासकीय सेवा वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पासपोर्ट, क्रीडा सेवांनाही ऑनलाइन प्राधान्य
पासपोर्ट सेवेशी संबंधित कामकाज आणखी वेगाने करण्याच्या सूचना डॉ. जाधव यांनी दिल्या. तसेच क्रीडा विभागानेही ऑनलाइन सेवांना प्राधान्य देऊन नागरिकांना घरबसल्या किंवा जवळच्या सेवा केंद्रातून सेवा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
शासकीय सेवा देताना नागरिक हा केंद्रबिंदू मानून काम करणे आवश्यक आहे. सेवा मिळविण्यासाठी नागरिकांना अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत, अर्जाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि निर्धारित कालावधीत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, ऑनलाइन अर्जांची स्थिती, प्रलंबित अर्ज, सेवा देण्याची कालमर्यादा तसेच ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिकाधिक शासकीय सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
