दुष्काळाच्या झळा तीव्र; अधिकारी शेताच्या बांधावर, शेतकऱ्यांना मदतीची आस

पंचनाम्यांना वेग; सुट्टीच्या दिवशीही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर|

आता मदतीची प्रतीक्षा..

यशश्री अपडेट्स | परंडा :

परंडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले असून, तालुक्याची नजरअंदाज पैसेवारी ४० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टीच्या दिवशीही महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला काही प्रमाणात साथ दिली असली तरी त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांना मोठा फटका बसला. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, सोयाबीनसह विविध खरीप पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

‘ट्रिगर-१’नंतर पंचनाम्यांना गती

शासनाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिगर-१’ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे.

परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे ग्राम महसूल अधिकारी विष्णूराजे जाधव, कृषी सहाय्यक गुंड आणि ग्रामविकास अधिकारी लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, झालेली हानी तसेच उत्पादनावर झालेला परिणाम याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात आली.

शेळगावातही शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

शेळगाव येथेही महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी धीरज साळुंखे, ग्रामविकास अधिकारी दत्ता गरड, सहाय्यक कृषी अधिकारी गुंड, बाळासाहेब कोळी आणि मनोहर कसबे यांनी शेताच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी करत पिकांच्या नुकसानीची नोंद केली.

यावेळी गुरुदास काळे, शंकर काळे, सुशेन काळे, गोकुळ काळे, रामचंद्र काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पिकांची स्थिती, पावसातील खंड आणि झालेल्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली.

पंचनामे झाले; आता मदतीची प्रतीक्षा

सुट्टीच्या दिवशीही अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी करत असल्याने पंचनाम्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी होत असल्याने नुकसानीची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, मदतीचे स्वरूप काय असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला किती मदत मिळणार, हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

पेरणीपासून मशागतीपर्यंत झालेला खर्च, खत-बियाणे, औषध फवारणी तसेच इतर शेती खर्चाचा मोठा भार शेतकऱ्यांवर आहे. त्यातच उत्पादन हातातून गेल्याने पुढील हंगामाची तयारी, कर्जफेड आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

मदत तातडीने मिळण्याची अपेक्षा

पंचनाम्यांची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाने मदतीसाठी अनावश्यक विलंब न करता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने मदत जमा करावी, अशी मागणी होत आहे.

दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही शेताच्या बांधावर पोहोचून पाहणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे नुकसानीचे अचूक चित्र समोर येईल, अशी अपेक्षा आहे. आता या पंचनाम्यांचे रूपांतर प्रत्यक्ष आर्थिक मदतीत कधी होते, याकडे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!