दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबीयांकडून १० लाखांची मदत व वारसाला नोकरीची मागणी

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील ३२ वर्षीय शेतकरी दयानंद संतराम राठोड यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि कर्जफेडीची चिंता यामुळे ते आर्थिक अडचणीत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर राठोड यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत आणि इतर सहाय्य देण्याची मागणी केली आहे.

दयानंद राठोड यांच्याकडे सुमारे चार एकर शेती होती. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पावसाअभावी पिकाला अपेक्षित सुरुवात न मिळाल्याने मोठे नुकसान झाले. त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यामुळे आर्थिक संकट अधिक गंभीर झाले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

घटनेनंतर राठोड यांच्या मृतदेहाचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून आर्थिक मदतीसह विविध मागण्या केल्या. या वेळी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आमदार कैलास पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन राठोड कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची भेट घेतली. शासनाच्या माध्यमातून राठोड कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

कर्ज नाकारल्याचा कुटुंबीयांचा आरोप

राठोड यांनी कर्जासाठी प्रयत्न केले असता सिबील स्कोअरचे कारण देत कर्ज नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे संबंधित बँकेच्या कर्जप्रक्रियेची चौकशी करून, दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

राठोड यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत, वारसाला शासकीय नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी तसेच कर्ज नाकारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या कुटुंबीयांकडून करण्यात आल्या.

प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ कुटुंबाला देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, तसेच संबंधित प्रकरणात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर परिस्थिती निवळली.

‘सरकारच्या घोषणा, प्रत्यक्ष मदत नाही’ असा नातेवाईकांचा आरोप

दुष्काळ आणि नापिकीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप राठोड यांच्या नातेवाईकांनी केला. शेतकरी कुटुंबांना केवळ आश्वासन न देता तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

दयानंद राठोड यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये : पालकमंत्री

दुष्काळ, नापिकी आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, संकटग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राठोड कुटुंबाला शासनाकडून किती आणि कोणत्या स्वरूपाची मदत मिळते, तसेच कर्जप्रकरणातील तक्रारीवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता खानापूरसह जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!