कळंबच्या चौघांना अटक; दोघे फरार, सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून तीन दिवसांत गुन्ह्याचा उलगडा
यशश्री अपडेट्स | धाराशिव :
कला केंद्रातील अंतर्गत वादातून एका ३१ वर्षीय गर्भवती नर्तिकेचा खून करून तिचा मृतदेह तब्बल २७५ किलोमीटर दूर धुळे जिल्ह्यातील निर्जन जंगल परिसरात नेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा धुळे पोलिस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत छडा लावला असून, कळंब येथील तीन जणांसह जामखेड येथील एका नर्तिकेला अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोघे संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मयत नर्तिका पिंकी हनुमंत काटकर (वय ३१) ही रायगड जिल्ह्यातील रहिवासी असून ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील ‘सप्तसूर’ सांस्कृतिक कला केंद्रात काम करत होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. यापूर्वी ती धाराशिव येथील एका कला केंद्रातही कार्यरत होती, अशी माहिती मिळाली आहे. मयत आणि आरोपींचा कळंबशी संबंध असल्याने या दिशेनेही तपास करण्यात आला.
धुळे जिल्ह्यात जंगलात आढळला महिलेचा मृतदेह
२२ सप्टेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ परिसरात चाळीसगाव-धुळे महामार्गाच्या पश्चिमेला मुरमाड टेकड्यालगतच्या वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी एका महिलेचा गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मोहाडीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
महिलेचा मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्याने सुरुवातीला तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे तसेच जळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले. या प्रकरणी मोहाडीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२२/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महामार्गावरील तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयास्पद वाहनांची हालचाल, वाहन क्रमांक आणि प्रवासाचा मार्ग याचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर वाहनाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून पोलिसांचे पथक जामखेड येथील ‘सप्तसूर’ सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोहोचले. तेथून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि पोलिसांनी संशयितांची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले.
कळंबच्या तिघांसह जामखेडच्या नर्तिकेला अटक
या प्रकरणात पोलिसांनी कळंब येथील सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (३८), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (३१) आणि लक्ष्मी बालाजी पवार (३०) या तिघांना, तर जामखेड येथील नर्तिका स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (२८) हिला अटक केली आहे.
तर कळंब येथील फारुख शेख आणि छत्रपती संभाजीनगर येथील रोहिणी जाधव हे दोघे फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
कला केंद्रातील वादातून हत्येचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कला केंद्रातील अंतर्गत वादातून मयत पिंकी काटकर हिचा आरोपींसोबत वाद झाला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात तिच्यावर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली.
ती मृत झाल्याचे आरोपींना वाटल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह वाहनातून राजस्थानच्या दिशेने नेण्याचे ठरवण्यात आले. मात्र, सुमारे २७५ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन वनक्षेत्रात वाहन थांबवण्यात आले. तेथे तिच्या अंगावर पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपी मालेगाव-मनमाड मार्गे जामखेडच्या दिशेने परतल्याचे तपासात समोर आले आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेत घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा तपास पुढे नेऊन आरोपींना अटक करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
एका आरोपीविरुद्ध विविध गुन्हे
अटक करण्यात आलेल्या सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार असलेल्या दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास केला जात आहे. तसेच हत्येमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेतील इतर बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.
ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, नितीन करंडे, अशोक पायमोडे तसेच पोलिस अंमलदारांनी केली.
धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण आणि पोलीस अंमलदार नागनाथ गुरव यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
